धरणगाव (उपसंपादक प्रा.पी.एम.पाटील) – पाळधी येथे वारंवार वीज जात असल्याने नागरिक हैराण होते, या नागरिकांनी गाऱ्हाणे मांडल्यानंतर पाळधी, ता. धरणगाव येथील वीज वितरण कंपनीवर जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी धडक देऊन वारंवार वीज गुल होण्याबाबत जाब विचारला तसेच वीज वितरण कंपनीचा कारभार सुधारण्याची तंबी देखील त्यांनी दिली
येथे काही दिवसांपासून वारंवार वीज जात असल्याने नागरिक हैराण झाले हॊते या बाबत वीज वितरण कंपनी मूग गिळून बसली होती. वीज वितरण कंपनीचा कारभाराबाबत पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी ही येथील अभियंता यांना फोन करून तंबी दिली होती. येथील अभियंता यांनी याबाबत काहीच कार्यवाही न केल्याने जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी सरळ वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली व याबाबत विचारणा केली मात्र समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांनी कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. यावेळी धावपळ सुरू झाली आणि त्यांनी वीज जाणार नाही याची ग्वाही दिली मात्र तुमचा कारभार न सुधारल्यास परत शिवसेना स्टाईल धडक देण्यात येईल, अशी तंबी प्रतापराव पाटील यांनी येथील कर्मचाऱ्यांना दिली.








