जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून, आसोदा रेल्वेगेट जवळ आठ महिन्याच्या बालकाचे मोकाट कुत्र्यांनी अत्यंत क्रूर पध्दतीने लचके तोडून जीव घेतला. ही बाब गंभीर असून, याबाबत तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे, असे निवेदन जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीतर्फे महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले आहे.
जळगाव महानगरपालिका प्रशासन आता तरी जागे होईल का? या मथळ्याखाली दिलेल्या या निवेदनात शहरात मोकाट कुत्र्यांनी हैदास मांडला असून, आसोदा रेल्वेगेटजवळ घडलेल्या या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. मोकाट कुत्र्यांमुळे रात्री अपरात्री अगदी दिवसासुध्दा एकटी लहान मुले, वयोवृध्द स्त्रियांचे घराबाहेर निघणे मुश्कील झाले आहे. तरी जळगाव महानगपालिका प्रशासनाने त्वरित मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा महापालिका प्रशासनाविरोधात जळगाव ग्रामीण व शहर काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर जळगाव (ग्रामीण) तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मनोज डिगंबर चौधरी, शहर उपाध्यक्ष श्याम तायडे, प्रदेश प्रतिनिधी ज्ञानेश्वर कोळी, प्रमोद घुगे, भिकन सोनवणे, धनराज जाधव, देवेंद्र मराठे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.








