नृत्य परिषदेच्यावतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे आंदोलन

पुणे (प्रतिनिधी सुनिल बोसले) – पुण्यातील लावणी, लोकधारा, नाट्य-सिने, एकपात्री, जादूगर, नृत्य, साऊंड लाइट, बॅक स्टेज कलाकार तसेच लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे.

नृत्यावर अवलंबून असलेल्या कलावंतांनी जगायचं कसं? जत्रा गेल्या, यात्रा गेल्या, सांगा आम्ही पोट भरायचं कस? असे विविध फलक घेऊन या कलाकारांनी आंदोलन केले.

शासनाने सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्यावी, नाट्यगृहे आणि सांस्कृतिक केंद्रे त्वरित सुरू करावीत, ‘हाताला काम द्या खिशाला दाम द्या’, अशा मागण्या करीत नृत्य परिषद महाराष्ट्रच्या वतीने पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आंदोलन करण्यात आले.

गेल्या पाच महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे नाट्यगृहांसह विविध सांस्कृतिक केंद्रे बंद आहेत. कार्यक्रम होत नसल्याने कलाकार अडचणीत आहेत. त्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारने नाट्यगृहे आणि सांस्कृतिक केंद्रे त्वरित सुरू करावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली.

नृत्य परिषदेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले म्हणाले, गेल्या 5 महिन्यांपासून विविध संस्था, संघटनांच्यावतीने कलाकारांना मदत करण्यात आली आहे. शासनाला मनोरंजन कार्यक्रमातून कर रुपात मोठं उत्पन्न मिळत असते.
शासनाने जबाबदारी म्हणून या कलाकारांच्या मागे उभे राहायला हवं. या पाच महिन्यांमध्ये अनेक सण-उत्सव येऊन गेले. निदान या कलाकारांना नवरात्रीचे कार्यक्रम तरी मिळावेत, अशी अपेक्षाही यावेळी मेघराज राजेभोसले यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here