नाशिकरोड (प्रतिनिधी) – लॉकडाऊन काळात शासनाच्या निर्देशाप्रमाणे बंद असलेली रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार आजपासून मनमाड-मुंबई विशेष रेल्वे सुरू होत असल्याने येथील चाकरमान्यांची सोय होणार आहे.
यासह एकूण 80 विशेष रेल्वेगाड्या देशभरात सुरू होत आहे. प्रवाशांना गाडी सुटण्याच्या आधी नव्वद मिनीटे अगोदर यावे लागेल. मुंबईहून परत येतानाही दीड तास आधी स्टेशनवर हजर रहावे लागणार आहे. येऊन जाऊन तीन तास जादा लागणार आहे.
करोनाची लक्षणे नसलेल्या प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल. प्रवासापूर्वी थर्मल स्क्रिनिंगसाठी किमान 90 मिनिटे अगोदर यावे लागेल. करोनाबाबतचे निकष, नियम यांचे पालन करावे लागेल. केवळ वैध तिकिट असलेल्या प्रवाशांना प्रवास करता येईल. प्रतिक्षा यादीतील प्रवाशांना परवानगी नाही. प्रवाशांना फेस मास्क अनिवार्य आहे.







