शाळांची घंटा दिवाळीनंतर वाजणार

पुणे (प्रतिनिधी बाजीराव नाईक) – करोना पार्श्‍वभूमीवर सध्या शाळा सुरू करण्यास राज्यातील संस्थाचालकांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे आता दिवाळीनंतरच शाळा सुरू करण्यात येणार आहे, असे संकेत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले.
करोनामुळे मार्चपासून राज्यातील शाळा बंद आहेत. 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु झाले असले तरी प्रत्यक्षात शाळा अद्यापही बंदच आहेत. त्या कधी सुरू होणार? असा प्रश्‍न विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना पडला आहे. दरम्यान, केंद्र शासनाने 21 सप्टेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा नियमित सुरू करण्याबाबत राज्य शासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्याबाबत मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत.
या पार्श्‍वभूमीवर शाळा सुरू करण्याबाबत चर्चा करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाइन बैठक घेण्यात आली. यात शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, नागपूरचे रवींद्र फडणवीस, औरंगाबादचे रजनीकांत गरुड, लातूरचे प्राचार्य अनिरुद्ध जाधव, युनिसेफच्या रेश्‍मा अग्रवाल यांच्यासह इतर काही अधिकारीही सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here