फडणवीसांनी मुलीची शपथ घेत मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती

एकनाथराव खडसेंचा खळबळजनक दावा

मुंबई (हितेश मिस्त्री) – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुलीची शपथ घेत आपल्याला राज्यपालपदाची ऑफर दिली होती, असा खळबळजनक दावा एकनाथराव खडसे यांनी केला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नाथाभाऊंनी हा गौप्यस्फोट केला.
मी विधानसभेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मला त्यांच्या अँटिचेंबरमध्ये बोलावलं होतं. त्यावेळी त्यांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती. त्यावेळी मला काही राज्यपालपदाची इच्छा नाही असं मी त्यांना सांगितलं. तेव्हा मुलीची शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला राज्यपाल करणार आहोत आणि पक्षश्रेष्ठीची त्याला संमती असल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं, असं नाथाभाऊंनी म्हटलं आहे.
राज्यपाल पद मिळाले नाही. त्यानंतर फडणवीस यांनी मला पुन्हा राज्यसभेत पाठवणार असल्याचं सांगितलं. राज्यातून राज्यसभेसाठी कुणीही जाणार नाही. फक्त तुमचंच नाव पाठवणार आहोत आणि तुमचं नाव पाठवण्यास पक्षश्रेष्ठींची काहीच हरकत नसल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं होतं. पण नंतर चार दुसरीच नावं आली, असंही त्यांनी सांगितलं. माझ्याकडे काही पुरावे आणि फोटोग्राफ्स आहेत. ही माहिती उघड केली तर धक्का जरूर बसेल, असा दावाही त्यांनी केला. त्यामुळे एकनाथराव खडसेंकडे कोणते पुरावे आहेत? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे.
मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन… ही घोषणा विधानसभा निवडणुकीत देण्यात आली. ही घोषणा भाजपची नव्हती. ती सुधीर मुनगंटीवार किंवा इतर कुणाचीही नव्हती. ती घोषणा फक्त फडणवीसांचीच होती, असा टोलाही त्यांनी लगावला. प्रमोद महाजन-गोपीनाथ मुंडे यांच्याकाळात विरोधी पक्ष म्हणून आम्ही एक दिलाने काम करायचं. महाजन-मुंडेंनी काही प्रश्न हाती घेतला तर भाजपचे सर्वच नेते मोहोळ उठवायचे. त्यातून वातावरण निर्मिती व्हायची. आजच्या भाजपमध्ये ते चित्रं पाह्यला मिळत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. आपण मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होतो म्हणूनच आपल्याला खड्यासारखे बाजू केल्याची खदखदही त्यांनी बोलून दाखवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here