- एकूण बळींचा आकडा 659, जास्त बळी सातारा, कराड तालुक्यात
- जिल्हय़ात लॉकडाऊनच्या अफवा, नागरिकांमध्ये भीती अन गोंधळ
- आरोग्य विभागाकडे मनुष्यबळ कमी, ऑक्सिजन बेडची कमतरता
- काळजी घेत लढत रहावे लागणार, बळी नसताना गावांची नावे यादीत
- शिवसेनेचे सातारा शहर प्रमुख बाधित
सातारा (विशेष प्रतिनिधी सोमनाथ जाधव) – दररोज रात्री 10 वाजता येणारा अहवाल प्रशासनाचा अहवाल अंगावर काटा आणत असून शनिवारी रात्री उच्चांकी 1086 जणांचा अहवाल बाधित आला आहे तर रविवारी सकाळी आलेल्या अहवालात कोरोना बळींचा आलेली 35 संख्या चिंता वाढवणारी ठरली आहे. बाधितांची वाढती संख्या व वाढत चालेलला मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासनासह जिल्हावासियांना आता कंबर कसावी लागणार आहे. जिल्हय़ात ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची कमतरता आहे तर आरोग्य विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याने उपलब्ध स्थितीशी संघर्ष करुन कोरोनाविरुध्दचा लढा जिंकावा लागणार आहे.
दरम्यान, शनिवारी रात्रीच्या अहवालात 1086 जणांचा अहवाल बाधित आला असून रविवारी सकाळपर्यंत जिल्हय़ातील विविध हॉस्पिटलमध्ये 35 बाधितांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. तर रविवारी सायंकाळी आलेल्या अहवालात 266 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र रात्री उशिरा आलेल्या अहवालात 629 एवढय़ा जणांचा अहवाल बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्हय़ात 35 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे शिरवळ 63 वर्षीय पुरुष, खिंडवाडी 83 वर्षीय पुरुष, सोनगाव ता. जावळी 55 वर्षीय महिला, आकाशवाणी सातारा 42 वर्षीय पुरुष, कृष्णानगर सातारा 70 वर्षीय महिला, काशिळ 70 वर्षीय पुरुष, कारी 48 वर्षीय महिला, गोडोली सातारा 80 वर्षीय पुरुष, सदरबझार 35 वर्षीय पुरुष, म्हसवे सातारा 68 वर्षीय पुरुष, एकंबेरोड कोरेगाव 62 वर्षीय पुरुष, घोणशी कराड 65 वर्षीय महिला, पवारनिगडी 60 वर्षीय पुरुष, संगमनगर सातारा 70 वर्षीय पुरुष, सातारा 60 वर्षीय पुरुष, सुभाषनगर सातारा 63 वर्षीय पुरुष, शेंद्रे सातारा 69 वर्षीय पुरुष, पाडळी सातारा 66 वर्षीय पुरुष तसेच विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये शेरे शेणोली ता. कराड 62 वर्षीय पुरुष, निमसोड ता. खटाव 65 वर्षीय महिला, जाखणगाव ता. खटाव 55 वर्षीय महिला, साकुर्डी ता. कराड 65 वर्षीय पुरुष, रविवार पेठ वाई 75 वर्षीय पुरुष, गणपती आळी वाई 82 वर्षीय पुरुष, नागठाणे ता. सातारा येथील 64 वर्षीय महिला, तामजाईनगर सातारा 68 वर्षीय पुरुष, शाहूपुरी सातारा 70 वर्षीय महिला, सैदापुर सातारा 52 वर्षीय महिला, कोरेगाव 88 वर्षीय पुरुष, पळशी ता. खटाव 40 वर्षीय पुरुष, वहागाव कराड 58 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ कराड 82 वर्षीय महिला, खटाव 64 वर्षीय पुरुष, नवेचीवाडी वाई 55 वर्षीय पुरुष, चांदक वाई 84 वर्षीय पुरुष असे एकूण 35 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.
बळी नसताना गावांची नावे यादीत
शुक्रवार दि. ११ रोजी जिल्हा माहिती कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार मोरघर येथील ६५ वर्षीय व सायगांव ता. जावली येथील ५६ वर्षीय व्यक्ती यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अशी माहिती माध्यमांना देण्यात आली होती. मात्र या दोन्ही गावात आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून सदर व्यक्ती शोधून काढण्याचा प्रयत्न केला असता. दोन्ही गावात अशी घटनाच घडली नसल्याचे समोर आले असून याबाबतची खात्री स्वतः तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवानराव मोहिते यांनी केली आहे. मग त्या गावातील कोणाचाही कोराना बळी गेले नसताना गावांची नावे यादीत आल्याने दोन्ही गावात संभ्रम निर्माण झाला होता व आहे.
जिल्ह्यातील 266 जणांची कोरोनावर मात
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये रविवारी संध्याकाळपर्यंत उपचार घेत असलेल्या 266 नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे एकूण कोरोनामुक्तांंची संख्या 14 हजार 833 झाली आहे. ती पंधरा हजारानजिक असून ही कोरोनामुक्ती दिलासादायक आहे.
वाढत्या मृत्यूदराने भीती वाढतेय
जिल्हय़ात कोरोनामुक्त होणाऱयांची संख्याही मोठी असली तरी वाढत्या मृत्यूदराने चिंतेचे वातावरण निर्माण होवू पहात आहे. जिल्हय़ात आजमितीपर्यंत 659 कोरोना बळी गेले असून रविवारी 35 एवढा उच्चांकी आकडा समोर आल्याने भीती वाढतेय. यामध्ये सातारा तालुक्यात तब्बल 173, कराड तालुक्यात 116 अशी मोठी संख्या आहे तर वाई 62, खटाव 53, पाटण 44, फलटण 41, कोरेगाव 35, खंडाळा 24, जावली 23, माण 16, महाबळेश्वर 8 अशी तालुकानिहाय स्थिती आहे.
शिवसेनेचे शहरप्रमुख शिंदे कोरोना बाधित
शिवसेनेचे सातारा शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. गेल्या चार दिवसांपूर्वी त्यांनी तपासणी केली तेव्हा त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. नंतर पुन्हा त्यांनी तपासणी केली असता रविवारी रिपोर्ट बाधित आला. त्यांना कालपासून चक्कर येणे व इतर त्रास जाणवू लागला होता. सायंकाळी उशिरा त्यांना सातारा शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
4 हजार 211 होम आयसोलेट
जिल्हा बाधितांची संख्या वाढत असली तरी ज्यांना काहीच लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहे असे 4 हजार 211 नागरिक होम आयसोलेट आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष उपचारार्थ रुग्णांची संख्या 8 हजार 727 असली तरी निम्मेच बाधित विविध हॉस्पिटल्स तसेच कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. होम आयसोलेशनचा पर्याय दिल्याने नागरिक त्याला पसंदी देत असल्याने जिल्हय़ातील कोरोना केअर सेंटरमध्ये सध्या 1176 जण निरीक्षण व उपचाराखाली आहेत. सर्व कोरोना केअर सेंटरमध्ये 2019 बेड खाली आहे मात्र ते ऑक्सिजन विरहित आहेत.
फिजीशियन व नर्सेसची कमतरता
आरोग्य विभागात 50 ते 55 वरील कर्मचारी काम करायला कचरु लागले आहेत. मुळात आरोग्य विभागाकडे मनुष्यबळ कमी आहे. त्यातच बाधितांची संख्या वाढत असल्याने त्यांच्यावर प्रचंड ताण वाढलाय. आरोग्य विभागाने आरोग्य कर्मचारी, फिजीशियन डॉक्टर्ससाठी जाहिरात देवून देखील त्यासाठी एकाचाही अर्ज आला नसल्याचे वास्तव आहे. कोरोना विरुध्द लढाईत आरोग्य विभागात काम करायला कोणीही तयार नाही मात्र बोलायला खूप तयार अशी अवस्था सध्या आहे.
काळजी घेत लढा यशस्वी करावा लागणार
जिल्हय़ात लॉकडाऊन करुन संसर्ग रोखण्याचा प्रयत्न नागरिक स्वयंस्फुर्तीने करु लागलेत. टेस्टिंग वाढवल्याने बाधित समोर आले की लक्षणांनुसार त्यांचे विलगीकरण करुन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. सध्या ऑक्सिजन व व्हेंटीलेटर बेडची कमतरता मोठी आहे. तर त्यासाठी फिजीशियन डॉक्टर्स व नर्सेस उपलब्ध नाहीत. त्यामुळे निसर्गशक्तीची प्रार्थना करत मास्क वापरणे, हात धुवणे व संपर्क टाळूनच आता कोरोनाच्या तडाख्यातून वाचावे लागणार आहे. काही महिने तर सार्वजनिक समारंभासह, मार्केट व गर्दीच्या ठिकाणी फिरताना काळजी अनिवार्यच ठरणार आहे.
246 जणांचे नमुने तपासणीला
सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 20, खंडाळा 103, पानमळेवाडी 26, मायणी 162, महाबळेश्वर 35, खावली 41 असे एकूण 246 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
रविवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमुने 56,160, एकूण बाधित 24,578, एकूण मुक्त 14,833, मृत्यू 659, उपचारार्थ रुग्ण 9,086
शुक्रवारी एकूण बाधित 629, एकूण मुक्त 266, एकूण बळी 35







