
परमानंद आश्रम दादर-पेण येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
अलिबाग-सोगावकर – निसर्गाच्या सानिध्यात मन कसे प्रसन्न होते याचा अनुभव मी घेत आहे,आज येथे माझ्या हातून नारळाच्या रोपांची लागवड केली आहे,नारळाला आपण सारेजण कल्पवृक्ष म्हणतो मानवी जीवनात आपल्या प्रत्येकवेळी शुभकार्यास त्याची गरज पडते आणि तो सर्वांना उपयोगी पडतो,त्याप्रमाणे आपल्या जीवनात प्रत्येकाने कल्पवृक्षाप्रमाणे परोपकारी जीवन जगून मनसोक्त आनंद घ्यावा, असे मार्गदर्शन रायगडचा युवा फाऊंडेशन आणि परमानंद आश्रम दादर-पेण यांनी आयोजित केलेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात पेण एज्युकेशनचे अध्यक्ष तथा रायगड जिल्हा शांतता कमिटीचे सदस्य ॲड. मंगेश नेने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते,त्यावेळी ते बोलत होते.
अधिक मार्गदर्शन करताना ॲड.मंगेश नेने म्हणाले की याठिकाणी पुढील काळात आमच्या कॉलेजच्या एन.एस.एस विद्यार्थ्यांचा कॅम्प आयोजित करण्यात येईल, यापुढील काळात परमानंद आश्रमाला सर्वतोपरी सहकार्य व मदत करण्याचे आश्वासन देत आहे,असे शेवटी बोलताना सांगितले.
रायगडचा युवक फाउंडेशनचे अध्यक्ष रायगड भूषण व ज्येष्ठ पत्रकार जयपाल पाटील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते, ते म्हणाले की दादर खाडीकिनारी असलेला परमानंद आश्रम हे महाराष्ट्र शासनाने पर्यटन केंद्र म्हणून मान्यता दिली असून आश्रम विकसित होत आहे, येथे अतिशय सुंदर व निसर्गरम्य वातावरण आहे, याठिकाणी आल्हाददायक वातावरण नयनरम्य नजारा असून शुद्ध हवेचे ठिकाण आहे.
ॲड.मंगेश नेने यांच्या ४२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण करून येथे साजरा करीत आहोत, या वृक्षारोपणामुळे पर्यावरणाला निश्चितच मदत होत आहे.या पवित्र ठिकाणी आपण सर्वांनी कोविड-19 संपल्यावर सहकुटुंब भेटण्यासाठी यावे असे आवाहन त्यांनी केले. आश्रमातर्फे ॲड. मंगेश नेने यांचा शाल व श्रीफळ देऊन सचिव उदय पाटील आणि खजिनदार जनार्दन पाटील यांनी सन्मान केला. यावेळी आश्रमाचे अध्यक्ष कृष्णकांत पाटील ,सहसचिव नरेंद्र पाटील , खजिनदार एकनाथ पाटील, गोरखनाथ पाटील,गुरव सर, प्रांत ग्राहक संरक्षण परिषद चे कोकण प्रदेश अध्यक्ष व मतभेद चे पत्रकार वैभव कांबळे,नविमुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक संजीव कांबळे,आपत्ती व सुरक्षा मित्र विकास रणपिसे, पत्रकार अब्दुल सोगावकर आणि दादर ग्रामस्थ, महिला, मुले,मुली सुरक्षित अंतर ठेवून कार्यक्रमात सहभागी झाले होते.






