कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्राण्यांपासून माणसांना धोका

लंडन – कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळविण्यात मानवाला यश आले, तरी प्राण्यांमार्फत या विषाणूच्या संक्रमणाचा धोका कायम आहे. या महामारीच्या दुसर्‍या लाटेला प्राणीच कारणीभूत ठरतील, असा दावा युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या शोध अहवालात करण्यात आहे.
5 मार्चला हाँगकाँगमध्ये दोन पाळीव श्वानांना मानवामार्फत कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, त्यांच्या शरीरात अँटीबॉडीही तयार झाली होती. 5 एप्रिल रोजी न्यूयॉर्कमधील एका प्राणी संग्रहालयात चार वर्षांची वाघीण पॉझिटिव्ह आढळून आली. त्यानंतर 22 एप्रिलला चार वाघ आणि 3 सिंहांनाही लागण झाल्याचे समोर आले होते.
या शोधाची माहिती लेंसेट जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली आहे. मानवामार्फत पाळीव प्राण्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आणि अशा घटनांमध्ये वाढ झाली, तर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. संक्रमित प्राण्यांकडून मानवाला संसर्ग होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. नेमका कोणत्या प्राण्याकडून सर्वात अधिक धोका आहे, याचा शोध घेणे महत्त्वाचे असल्याचे या संशोधनात सहभागी असलेल्या प्राध्यापिका जॉन सेंटिनी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here