पाकिस्तानला अमेरिकेने दिला दणका

वॉशिंग्टन- संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानची भारताच्या विरोधातील प्रस्ताव सादर करण्याची मागणी अमेरिकेने फेटाळून लावत पाकिस्तानचा डाव उधळून लावला आहे. त्यामुळे पाकिस्तान तोंडघशी पडला आहे. पाकिस्तानमध्ये होत असलेल्या दहशतवादी कारवायांमागे भारताचा हात असल्याचा कांगावा पाकिस्तान करत होता. मात्र, दहशतवादाला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर भारताला गुंतविण्याच्या पाकिस्तानच्या योजनेला अमेरिकेने धुडकावून लावले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या जैश-ए-महंम्मद या दहशतवादी संघटनेवर संयुक्त राष्ट्राने बंदी घालत संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी घोषित केले होते. त्यानंतर पाकिस्तानने हा कट रचला होता. मात्र, हा प्रस्ताव दाखल करण्यापूर्वीच अमेरिकेने पाकिस्तानचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. त्यामुळे पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. पाकिस्तानने वेळोवेळी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला कमी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण प्रत्येकवेळी पाकिस्तानच्या पदरी निराशाच पडली आहे.
दरम्यान, दहशतवादाच्या मुद्द्यावरुन अमेरिकेने नेहमीच पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. पाकिस्तानने आपल्या भूमीतील दहशतवादाला आळा घालावा असं आवाहन अमेरिकेकडून अनेकवेळा करण्यात आले आहे. मात्र, पाकिस्तानने दहशवादाला आळा घालण्यापेक्षा भारतावरच दोषारोप केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here