चीनमध्ये दहा दिवसीय वार्षिक श्‍वान-मांस बाजार सुरू

शांघाय – कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा धोका असला तरी, चीनमध्ये वार्षिक श्‍वान-मांस बाजार सुरू झाला. दहा दिवसांच्या या बाजाराला महोत्सवाचे स्वरूप असते. युलीन शहरात भरणाऱ्या या बाजारास दरवर्षी हजारो ग्राहक भेट देतात; पण यंदा हा आकडा थोडा कमी झाला आहे.
कोरोनाचे विषाणू वटवाघुळांमुळे पसरतात, अशी शक्‍यता असून त्या दृष्टीने संशोधन सुरू आहे. वुहानमधील मासळी बाजार हे संसर्गाचे उगमस्थान मानले जाते. त्यानंतर पाळीव प्राण्यांच्या बाजारात कडक उपाययोजना लागू करण्यात आल्या. एप्रिलमध्ये शेझेन शहरात श्‍वान खाण्यावर बंदी घालण्यात आली. असा निर्णय घेणारे हे चीनमधील पहिले शहर बनले.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चीनमध्ये श्‍वानाचे वर्गीकरण बदलण्यात आले आहे. आधी ‘पशुधन’ म्हणून गणला जाणारा श्‍वान आता ‘पाळीव प्राणी’ बनला आहे; पण श्‍वानाचे मांस खाण्याचे प्रमाण किती कमी झाले आहे, याविषयी वन्यप्राणी संरक्षक कार्यकर्ते साशंकच आहेत. सरकार पाळीव प्राण्यांच्या बाजारावर बंदी घालून त्यांचे संरक्षण करण्यासाठी नव्या योजना आखत आहे. त्यामुळे यंदाचा हा महोत्सव अखेरचा ठरेल, अशी त्यांना आशा आहे. या बाजारात छोट्या पिंजऱ्यांमध्ये श्‍वान कोंडले जातात. तेथे अनेक हॉटेलही असतात. श्‍वान मारून त्याचे मांस खाण्यासाठी इच्छुक ग्राहकांची तेथे गर्दी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here