नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – पीएम केअर्स फंडातून सर्वाधिक 181 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्राला देण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून मंगळवारी ही माहिती देण्यात आली.
पीएम केअर्स फंडातून भारतात 3 हजार व्हेंटिलेटर्स तयार करण्यात आले असून, त्यापैकी 1,300 व्हेंटिलेटर्सचे राज्यांना वाटपही करण्यात आले आहे. असे एकूण 50 हजार व्हेंटिलेटर्स तयार करण्यात येणार आहेत, असेही सरकारकडून सांगण्यात आले. 14 मे रोजी या पीएम केअर्स फंड ट्रस्टने 3100 कोटी रुपये कोरोनाविरोधी लढ्यासाठी जाहीर केले होते.
लोकसंख्या आणि कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेऊन सर्व राज्यांसाठी प्रमाण ठरविण्यात आले आणि त्यानुसारच निधीचे वाटप करण्यात आले. संशयित आणि बाधितांना अन्न व निवारा तसेच वैद्यकीय उपचार आणि स्थलांतर या उद्देशांसाठी हा निधी देण्यात आला. उत्तर प्रदेशला 103 कोटी, तामिळनाडूस 83 कोटी, गुजरात 66 कोटी, दिल्ली 55 कोटी, राजस्थान 50 कोटी आणि कर्नाटकला 34 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला.







