कोल्हापूर जिल्हा परिषदेने ‘रेमडेसिवीर’चे वाटप थांबविले

रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत वितरीत करणारी कोल्हापूर जिल्हा परिषद एकमेव

कोल्हापूर (नियाज जमादार) – कोरोनावरील सव्वादोन कोटी रुपयांची रेमडेसिवीर इंजेक्शन नागरिकांना मोफत वितरीत करण्यात आली. गोरगरीब सामान्य लोकांसाठी जिल्हा परिषदेने इंजेक्शन मोफत वाटप उपक्रम राबविला. परंतु, त्याचा मूळ हेतूच बाजूला पडू लागल्याने जिल्हा परिषदेने हा उपक्रम थांबविला. रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत वितरीत करणारी कोल्हापूर जिल्हा परिषद एकमेव होती.
साधारणपणे एक महिना हा उपक्रम सुरू होता. त्यामध्ये 2 कोटी 21 लाख रुपये किमतीची 6 हजार 500 इंजेक्शन नागरिकांना मोफत देण्यात आली. दिवसेंदिवस गर्दी वाढू लागली. बाजारामध्ये इंजेक्शन उपलब्ध करून दिले तरी काही खासगी हॉस्पिटलमधील रुग्णांचे नातेवाईक इंजेक्शनसाठी जिल्हा परिषदेमध्ये येऊ लागले. काही खासगी रुग्णालयाकडून आवश्यकता नसतानाही या इंजेक्शनची मागणी रुग्णांसाठी करण्यात येऊ लागल्याची चर्चा आहे. तसेच, काही पदाधिकारी आणि सदस्यांनीदेखील या इंजेक्शनसाठी आग्रह धरण्यास सुरुवात केली. परंतु, त्याला प्रशासनाने विरोध केला. यावरून वादावादीचे प्रसंग घडू लागले. त्यामुळे जिल्हा परिषदेने रेमडेसिवीर इंजेक्शनचे मोफत वितरणच बंद केले. आता जी इंजेक्शन येतात ती शासकीय रुग्णालयांमध्ये पाठविली जातात.
कोरोनावरील उपचारासाठी लागणारी सर्व औषधे आणि साहित्य खरेदीचे अधिकार जिल्हा परिषदेला दिले. यामध्ये महागड्या रेमडेसिवीर इंजेक्शनचाही समावेश होता. सुरुवातीच्या काळात हे इंजेक्शन बाहेर मिळत नव्हते. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक या इंजेक्शनसाठी सैरभैर होत असत. तरीही इंजेक्शन उपलब्ध होत नव्हते. याबाबत तक्रारी आल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या मान्यतेने जिल्हा परिषदेने मोफत रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेत असताना काही नियम व अटी घालत तीन डॉक्टरांची एक समिती स्थापन करण्यात आली.
रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता भासल्यास रुग्ण ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे तेथील डॉक्टरांचे पत्र, रुग्णाचे आधारकार्ड आणि इंजेक्शन मागणीच्या डॉक्टरांच्या पत्रावर स्थापन केलेल्या समितीमधील तीन सदस्यांपैकी एकाची सही या गोष्टी बंधनकारक करण्यात आल्या होत्या. इंजेक्शन महागडे असल्यामुळे गोरगरिबांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेल्या या उपक्रमामध्ये खासगी दवाखान्यांतील रुग्णांची इंजेक्शनची मागणी वाढू लागली. खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेत असतील त्यांनी संबंधित हॉस्पिटलकडून हे इंजेक्शन घ्यावे, अशी अपेक्षा होती. परंतु, गरिबांबरोबर खासगी रुग्णालयातील कोरोना बाधितांचे नातेवाईकदेखील लोक रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी जिल्हा परिषदेसमोर रांगेत उभे राहू लागले. त्यामुळे जिल्हा परिषदेसमोर रात्रीचीही गर्दी होऊ लागली.
जिल्हा परिषदेच्या वतीने आतापर्यंत 21 हजार 335 जणांनी रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी केली आहे. त्यापैकी 12 हजार इंजेक्शन आतापर्यंत जिल्हा परिषदेला प्राप्‍त झाली आहेत. त्यातील 6 हजार 500 इंजेक्शनचे मोफत वाटप करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here