इस्लामाबाद – पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( पीसीबी) मंगळवारी त्यांचे 7 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असलेले जाहीर केलं. इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पाकिस्तानी खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली आणि त्यानुसार आतापर्यंत 29 पैकी 10 खेळाडूंना कोरोना लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या इंग्लंड दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित निर्माण झाले आहेत. पण, बुधवारी एक धक्कादायक बाब समोर आली. पीसीबीनं जाहीर केलेल्या सात कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंपैकी एकानं खासगी केंद्रात चाचणी केली आणि त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे पीसीबीच्या चाचणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.
हैदर अली, हरीस रौफ आणि शादाब खान या तीन खेळाडूंनंतर फाखर जमान, इम्रान खान, कशीफ भट्टी, मोहम्मद हाफिज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान आणि वाहब रियाझ यांना कोरोना झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. पाकिस्तानचे खेळाडू 28 जूनला इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. तत्पूर्वी केलेला कोरोना चाचणीत पाकिस्तानचे 10 खेळाडू पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांना आता 14 दिवसांच्या आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार असून पुन्हा त्यांची चाचणी करण्यात येईल. त्यांचा आहवाल निगेटिव्ह आल्यास त्यांना इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची परवानगी मिळेल. पण, त्यांना तिथे आयसोलेशनमध्ये रहावे लागेल.
पीसीबीनं जाहीर केलेल्या कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंपैकी मोहम्मद हाफिजनं पुन्हा चाचणी केली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याचं त्यानं सोशल मीडियावरून जाहीर केले. त्यानं लिहिलं की,”पीसीबीच्या अहवालानंतर मी स्वतःच्या समाधानासाठी खासगी केंद्रात चाचणी केली. माझ्या कुटुंबीयांचीही चाचणी मी करून घेतली आणि त्यात सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले.”







