नंदुरबार ( जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम जिल्हास्तरावर 15 सप्टेंबर पासून सुरु झाली असून ही मोहिम राबविण्याबाबत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, तसेच तालुका आशा समुह संघटकाचे आज प्रशिक्षण घेण्यात आले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके यांनी मोहिम यशस्वी करण्यासाठी शासनस्तरावरुन देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना, मोहिम कालावधीत प्रत्यक्ष सर्वेक्षणासाठी वापरावयाचे मोबाईल ॲप बाबत मार्गदर्शन केले. तसेच मोहिम कालावधीत मनुष्यबळ व साधन सामुग्रीच्या कृती आराखड्याबाबत चर्चा करण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील 18 लाख 91 हजार 726 लोकांचे घरोघरी जावून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी एका पथकात तीन सदस्य असे एकूण 2 हजार 522 कर्मचाऱ्याची नेमणूक यासाठी करण्यात आली आहे. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य जिल्हास्तरावरुन वितरीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात मोहिम कालावधीमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांचा सक्रीय सहभाग करुन घेण्याबाबतही सूचना बैठकीत देण्यात आल्या.







