जगातील उंचावरील सर्वांत लांब बोगद्याचे काम पूर्ण

नवी दिल्ली – जगातील उंचावरील सर्वांत लांब बोगदा असलेला रोहतांग येथील अटल बोगदा हा वाहतुकीसाठी खुला होण्यास सज्ज झाला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 3,000 मीटर (10,000 फूट) उंचीवर हा बोगदा विसावलेला आहे. लडाखमध्ये भारत-चीन यांच्यात सीमाप्रश्नावरून तणाव निर्माण झालेला असताना हा बोगदा संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो आणि संघर्षाच्या क्षणी वेगाने हालचाली करण्याकामी संरक्षण दलांना उपयुक्त सिद्ध होऊ शकतो.
या बोगद्यासाठी 4,083 कोटी मंजूर करण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात 3,200 कोटी खर्चात बोगद्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव दिलेल्या या बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 9.02 किलोमीटर लांबीचा हा बोगदा लेह-मनाली महामार्गावरील पूर्व पीर पंजाल रेंजच्या रोहतांग खिंडीतून जातो. यामुळे हिमाचल प्रदेशातील मनाली आणि लडाखमधील लेहदरम्यानचे अंतर 46 किलोमीटर्सनी कमी होईल आणि प्रवासाचा 4 तासांचा वेळ वाचणार आहे.
बोगद्याच्या आतील विजेची आणि यांत्रिकी व्यवस्था चांगल्या प्रकारे काम करत आहे. 3,200 कोटींच्या खर्चात बोगदा पूर्ण झाल्याचा आम्हाला आनंद आहे. हिमालयातील 10,040 फूट उंचीवरील हा बोगदा म्हणजे अभियांत्रिकी चमत्कार आहे. जगातील इतक्या उंचीवरील सर्वात लांब ‘मोटर टनेल’चा विक्रम त्याने यापूर्वीच नोंदविला आहे, असे प्रकल्पाचे मुख्य अभियंता के. पी. पुरुषोत्तमन यांनी सांगितले.
उद्घाटनापूर्वी बोगद्यात बसविलेल्या यंत्रणांची अभियंत्यांकडून पुन्हा चाचणी करण्यात येत आहे. त्यात दर 60 मीटर्स अंतरावर अग्निशामक यंत्रणा, दर 500 मीटर अंतरावर बाहेर पडण्यासाठी आपत्कालीन बोगदे आणि दर 1 किलोमीटर अंतरावर हवेच्या गुणवत्तेचे परीक्षण करणारी यंत्रणा बसविण्यात आली आहे. तसेच नियमित अंतरावर आपत्कालीन प्रसंगी संपर्क साधण्यासाठी टेलिफोन बूथ, दर 250 मीटर्सवर सीसी कॅमेरे, प्रसारण यंत्रणा अशा यंत्रणांनी हा बोगदा युक्त आहे. बोगद्यामध्ये 4-जी इंटरनेट नेटवर्क व वेगवान इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करण्यात आली आहे.
बोगद्याची वैशिष्टय़े…
10 हजार फुटांवरील उंचावरील सर्वांत लांब बोगदा
10.5 मीटर रुंद आणि 5.52 मीटर उंची असलेला हा बोगदा 9.02 किलोमीटर लांबीचा आहे
जास्तीत जास्त 80 किलोमीटर प्रति तास वेगाने बोगद्यातून प्रवास करता येईल
दिवसाला 3 हजार कार्स आणि 1500 ट्रकची वाहतूक या बोगद्यातून होण्याची अपेक्षा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here