नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – नंदुरबार येथे कांदा निर्यात बंदीच्या विरोधात आज राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर निषेध आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी कांदाबंदीच्या केंद्र शासनाच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कांदा रस्त्यावर ओतुन या निर्यातबंदीला विरोध दर्शवण्यात आला. विशेष म्हणजे नुकतेच राष्ट्रवादी पक्षात दाखल झालेले माजी आमदार उदेसिंग पाडवी यांचे आजच्या आंदोलनात प्रमुख नेतृत्व दिसुन आले.
केंद्राने कांद्याच्या निर्यातीवर बंदी जाहीर केल्यानंतर राज्यभरात होत असलेल्या कांदा निर्यातबंदीच्या विरोधातील आंदोलनात आज नंदुरबार मध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने झालेल्या आंदोलनाने भर पडली. आज दुपारी बाराच्या सुमारास नंदुरबार शहरातील नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर हाताता कांदा घेवुन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱयांनी केंद्राने लादलेल्या या कांदा निर्यात बंदी विरोधात जोरदार निदर्शने केली. 
यावेळी केंद्र शासनाच्या विरोधातील घोषणाबाजी नंतर केंद्र शासनाचा प्रतिकात्मक निषेध करण्यासाठी कांदा रस्त्यावर फेकुन देण्यात आला. सध्या देशातील संचारबंदीच्या परिस्थीतीमुळे आधीच बळीराजाचा आर्थिक कणा मोडला असतांनाच केंद्राने त्याचे प्रमुख उत्पन्नाचे साधण असलेल्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी लादल्याने त्याचा परिणाम कांद्याच्या दरावर होणार असुन आपोआपच कांद्याच्या दरात घसरण होत आहे. त्याचा फटका हा शेतकऱ्यांना बसणार असल्याने कांदा निर्यात बंदीचा हा निर्णय शेतकरी विरोधी असल्याचे सांगत या निर्णयाचा न राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. कोवीडची परिस्थीती असल्यामुळे कायदा सुव्यस्थेची स्थिती पाहता यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे मोजकेच पदाधिकारी उपस्थित होते. याआंदोलनाच्या वेळी माजी आमदार उदेसिंग पाडवी, युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी.महिला जिल्हाध्यक्षा हेमलता शितोळे, राष्ट्रवादी जिल्हा शहराध्यक्ष रंजना कुवर, नंदुरबार तालुका अध्यक्ष राजु पाटील, धडगाव तालुका अध्यक्ष सिताराम पाडवी, विद्यार्थी जिल्हाद्यक्ष बबलु कदमबांडे, महिला तालुका अध्यक्ष अनिता बामणे, आशा रावल , रेश्मा पवार, दिपक साळवे, मोहन शेवाळे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.








