लेह – लडाखच्या उंच शिखरांवर गोठवून टाकणार्या थंडीला सुरुवात झाली आहे. थंडी सुरू होताच चिनी सैनिकांना हुडहुडी भरलेली आहे. आधीच चिनी सैनिकांचे मनोधैर्य भारतीय जवानांच्या तीव्र प्रतिकारामुळे खचलेले आहे. काही सैनिकांना या थंडीचा बहाणा मिळालेला आहे, तर बर्याच चिनी सैनिकांना असह्य थंडी असलेल्या उंच ठिकाणच्या पोस्टवरून स्ट्रेचरवरून लष्कराच्या तळावर नेण्यात येत आहे.
या भागात तापमान शून्य ते वजा 24 पर्यंत घसरते. शिवाय, श्वास घेणेही कठीण बनते. खरे पाहता तीव्र थंडी अद्याप सुरू व्हायची आहे. ‘मी येतेय’ असे लडाखचे दार तेवढे थंडीने ठोठावलेले आहे. आताच चिनी सैन्याला हवामानाचा त्रास होऊ लागला आहे, तर पुढे जेव्हा पारा आणखी घसरेल तेव्हा यांचे काय होईल, हा प्रश्न आहे. पँगाँग सरोवर परिसरात काही दिवसांपूर्वी चीनने घुसखोरी करून ताबा रेषा बदलण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देत हा डाव हाणून पाडला. नंतर भारतीय जवानांनी महत्त्वाच्या उंच ठिकाणांचा ताबा घेतला. चीननेही काही उंचावरील भागांवर आपले सैन्य तैनात करत भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला; पण आता थंडीने चिन्यांचे हाल सुरू झाले आहेत.
फिंगर-4 जवळील तापमान येत्या काही दिवसांत उणे 4 अंश सेल्सिअस इतके कमी होऊ शकते. ऑक्टोबर महिन्यात हे सरोवर गोठून बर्फ झालेला असतो. देप्सांग आणि दौलत बेग ओल्डी या भागातही तापमान उणे 14 अंश सेल्सिअस इतके कमी झालेले आहे. थंडी असह्य झालेल्या चिनी सैनिकांऐवजी चीनकडून नवीन सैनिक तैनात करण्यात येत आहेत. नव्याने तैनात सैनिकही किती दिवस थंडीला सामोरे जातील, हा प्रश्न आता चीनच्या सैन्यासमोर आहे.







