आयएनएस विराटच्या अंतिम यात्रेला प्रारंभ

मुंबई (हितेश मिस्त्री) – आयएनएस विराट भारतीय नौदलाची विमानवाहू युद्धनौकेने आपली अंतिम यात्रा सुरु केली आहे. सेवेतून निवृत्त झालेली ही नौका आज (दि. १९) मुंबईहून गुजरातच्या अलंग येथे जाणार आहे. तेथे ही नौका तोडून भंगारात विकण्यात येणार आहे.
आयएनएस विराटला टग बोट्सद्वारे ओढून नेताना जे नौदलातील निवृत्त अधिकारी, कर्मचारी पाहत होते त्यावेळी त्यांचा कंठ दाटून आला. त्यांनी आएनएस विराटला गेटवे ऑफ इंडिया वरून भानविक निरोप दिला. आयएनएस विराटला नौदलातून मार्च २०१७ ला निवृत्त करण्यात आले होते. आयएनएस विराटने देशाची जवळपास ३ दशके सेवा केली.
विराटच्या अंतिम यात्रेवेळी भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सनी आयएनएस विराटच्या भोवती घिरट्या घालत त्याला अखेरची मानवंदना दिली. संरक्षण दलाच्या प्रवक्त्यांनी सुरुवातीला विराटची अंतिम यात्रा शुक्रवारी सुरु होईल असे सांगितले होते. पण, या यात्रेला एक दिवस उशीर झाला.
आयएनएस विराटने देशाची जवळपास ३० वर्षे सेवा केली. त्याआधी तिने ब्रिटनच्या रॉयल नेव्हीत एचएमएस हर्मीस या नावाने आपली सेवा दिली होती. विराटचे एका संग्रहालयात किंवा रेस्टॉरंटमध्ये रुपांतर करण्याचे प्रयत्नही झाले. पण, कोणतीही योजना पूर्णत्वास आली नाही. त्यांनतर अलंगमधील श्रीराम ग्रुपने ही विशाल युद्धनौका तोडून ती भंगारात विकण्याची निविदा जिंकली. आता या कंपनीच्या मोठ्या जहाज ओढून नेणाऱ्या बोट विराटला अलंग येथे घेऊन जातील. विराटचा हा अंतिम प्रवास दोन दिवसांचा असेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रसंगी संरक्षण दलाच्या मुंबई विभागाच्या प्रवक्त्यांनी ट्विट केले की ‘विराट कॉलसाईन “रेमो टू टू ” एका युगाचा अंत, भारतीय नौसेनेच्या दैदिप्यमान इतिहासाचा एक अध्याय. विराट आज मुंबईतून त्याच्या अंतिम यात्रेसाठी निघणार. जुनी जहाजे मरत नाहीत, त्यांचा आत्मा कायम जिवंत राहतो.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here