जळगांव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – जळगाव शहर व शनिपेठ पोलिसांनी राबविलेल्या संयुक्त मोहिमेत विलास मधुकर लोट (वय-४०) यांच्या बळीराम पेठ येथील घराच्या झाडाझडतीत गावठी पिस्तुलासह, जिवंत काडतूस, कोयता व दोन गुप्त्या असा शस्त्रसाठा आढळून आला. या प्रकरणी विलास लोट यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध बेकायदेशीर विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बळीराम पेठ येथील विलास मधुकर लोट यांच्याकडे वेगवेगळे शस्त्र असल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधिक्षक नीलाभ रोहन यांना मिळाली होती. त्यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्याची पोलीस निरीक्षक अरुण निकम यांना सूचना देऊन खात्री करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले व सहाय्यक पोलिस अधिक्षक नीलाभ रोहन मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण निकम यांनी शहर पोलीस व शनीपेठ पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या पथकासह विलास लोट यांच्या बळीरामपेठ येथील घराची झाडाझडती घेतली असता गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस, कोयता व दोन गुप्त्या असा शस्त्रसाठा आढळून आला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून विलास लोट यांना अटक करण्यात आली आहे. तपास शहर पोलीस ठाण्याचे पोउनि जगदीश निकम हे करीत आहेत.
जळगाव शहर पोलीस ठाणे व शनिपेठ पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत शहर पोलीस ठाण्याचे एएसआय वासुदेव सोनवणे, पोहेकॉ. विजय निकुंभ,पोहेकॉ. महेंद्र पाटील, गणेश पाटील, किरण पाटील, रतन गीते, तेजस मराठे, योगेश इंदाटे, ओमप्रकाश पंचलिंग, महिला पोलीस अलका मोरे, तसेच शनिपेठ पोलिस ठाण्यातील पोकॉ. दिनेशर्सिंग पाटील, अभिजीत सैंदाणे, मुकुंद गंगावणे, किरण वानखेडे,अनिल कांबळे, राहुल पाटील यांचा पथकात समावेश होता.







