अलिबाग-सोगावकर – करंजा वरून १९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांची रेवसला जाणारी तर सेवा रेवसच्या धक्क्याजवळ किनाऱ्यापासून साधारण 150 ते 200 मीटर अंतरावर रेवस जवळ गाळात अडकून पडली.परिणामी प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला, तर सेवा सुमारे पावणे दोन तास जाग्यावरच उभी राहिली, काही वेळाने तिथे लहान बोटला(छोटी बोट)मागविण्यात आली, परंतु ती सुद्धा त्या गाळात अडकून पडली,असा प्रकार वारंवार व नित्याचेच सुरू असल्याचे प्रवासी वर्गातून समजले आहे. तरी संबंधित प्रशासन यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
रेवसधक्का जवळपास भरपूर प्रमाणात गाळ साचलेला आहे, परिणामी ओहोटी लागल्यावर तरसेवा,लॉन्च,गलबते लागण्यासाठी अडचणी येत आहे. तरी संबंधित लोकप्रतिनिधी,अधिकारी, प्रशासन यांनी याची गंभीर दखल घ्यायला हवी अशी मागणी होत आहे.त्याठिकाणी असणारा गाळ त्वरित काढावा व प्रवाशांना होणारा नाहक त्रास कमी करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
याबाबत आम्ही ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत मोकल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,तर सेवा गाळात अडकण्याचे मुख्य कारण म्हणजे रेवस बंदरात प्रचंड प्रमाणात गाळ साचला आहे.प्रवासी बंदरातुन गाळ काढण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड अर्थात शासनामार्फत करोडो रुपये खर्च करण्यात येतात.मात्र पुन्हा पुन्हा गाळ साचल्यामुळे हा खर्च पाण्यात जातो.यावर ठोस उपाय म्हणजे रेवस बंदर उत्तरेला कमीतकमी 150 ते जास्तीत जास्त 300 मीटर पुढे वाढविणे,लाखों प्रवाशांची जिव्हाळ्याची ही मागणी आम्ही शासन दरबारी गेली अनेक वर्षे मांडून त्याचा पाठपुरावा करीत आहोत,मात्र प्रवाशांच्या दुर्दैवाने ती आजतागायत प्रत्यक्षात आली नाही.
रेवस-करंजा तर सेवेबरोबरच रेवस-मुंबई जलवाहतुकीला देखील अमावस्या व पौर्णिमेला ३/४ दिवस अगोदर व ३/४ दिवस नंतर बंदरात कमी पाणी राहत असल्यामुळे अडथळा येत आहे. लवकरच रेवस-मुंबई जलवाहतुक सेवा देखील होणार आहे. तरी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने आपल्या मालकीच्या ड्रेजर ने रेवस बंदरातील गाळ काढण्याचे काम हाती घ्यावे व बंदर पुढे वाढविण्याच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनच्या वतीने राज्य शासनाकडे करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष श्री चंद्रकांत मोकल यांनी अधिक बोलताना सांगितले आहे.







