लडाखमधील ‘एलएसी’ जवळील सहा टेकड्या लष्कराच्या ताब्यात

नवी दिल्ली – पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील (एलएसी) उंचावर असलेल्या ६ नव्या टेकड्यांवर ताबा मिळवण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे. विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने वृत्तसंस्थेकडून ही माहिती देण्यात आली आहे. लडाखच्या पूर्व भागात असलेल्या या टेकड्यांवरून चिनी लष्करावर अंकूश ठेवणे सोपे जाणार आहे, हे विशेष. या टेकड्यांवर ताबा मिळविण्यासाठी चीनने हालचाली सुरू केल्या होत्या. हा डाव ओळखताच भारतीय सैन्याने तातडीने पावले टाकत या टेकड्या ताब्यात घेतल्या आहेत. २९ ऑगस्ट पासून या कारवाईला सुरूवात झाली होती. १५ सप्टेंबरपर्यंत या टेकड्या ताब्यात घेतल्या गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मगर हील, गुरूंग हील, रिसेहेन ला, रेझांग ला, मोखापरी आणि फिंगर-४ जवळची आणखी एक टेकडी अशा सहा ठिकाणी आता भारतीय जवानांचे वर्चस्व आहे. युद्धाचा प्रसंग आलाच तर भारतीय सैन्याला उंचावरून मारा करणे सोपे जाऊ शकते असा अंदाज संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
पूर्व लडाखमध्ये भारत-चीन दरम्यान अद्यापही तणावाचे वातावरण आहे. उभय देशांमध्ये राजनैतिक पातळीवर चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या, तरी सीमेवरचा तणाव कमी झालेला नाही. शांतता राखण्याचे ठरल्यानंतरही चिनी सैन्याच्या हालचाली सुरूच आहे. पंरतू, भारतीय लष्कराने सावधपणे चिनी लष्कराला हा मोठा दणका दिला आहे. काही दिवसांपूर्वीच चीनच्या टेहाळणी नौका भारतीय युद्ध नौकांवर लक्ष ठेवत असल्याची घटना उघडकीस आली होती. चीनच्या टेहाळणी नौकेने मलाक्काच्या समुद्रधुनी परिसरात प्रवेश केला होता. तिथून ते भारतीय नौकांची टेहाळणी करत होते अशी माहिती समोर आली आहे. त्या भागात तैनात असलेल्या भारतीय युद्ध नौकांवर ते सतत लक्ष ठेऊन होते. भारतीय नौदलाच्या ही बाब लक्षात येताच चीनच्या नौकेने काढता पाय घेतला,अशी माहिती सुद्धा आता समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here