मुंबई (हितेश मिस्त्री) – महाराष्ट्राचे जलसंपदा आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू तसेच राज्याचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण झाली. दोघांनी आपापल्या ट्विटर हँडलवर कोरोना झाल्याची माहिती दिली. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे. याआधी शुक्रवारी महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या दोन मंत्र्यांना कोरोना झाला. कोरोनाची बाधा झालेले महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेते वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार घेत आहेत आणि क्वारंटाइन झाले आहेत.
मागील काही दिवसांपासून बच्चू कडू सार्वजनिक ठिकाणी जात होते. अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी सरकारी कामकाजाचा आढावा घेतला होता. कोरोना संकटावर सुरू असलेल्या सरकारी उपाययोजनांची माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. या काळात ते अनेकांच्या संपर्कात आले होते. बच्चू कडू यांच्या पत्नी नयना कडू यांनाही कोरोना झाला आहे. कोरोना झाल्याचे लक्षात येताच बच्चू कडू तातडीने अचलपूरहून अमरावतीला गेले. तिथेच उपचार घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
बच्चू कडू यांच्या पाठोपाठ सुधीर मुनगंटीवार यांनी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. त्यांनी वैद्यकीय सल्ल्याचे पालन करत असल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यासह राणा कुटुंबातील अनेकांना एकदम कोरोनाची लागण झाली होती. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे काही दिवसांनी ते बरे झाले. याआधीही राज्यातील काही मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र वेळेवर उपचार घेतल्यामुळे सर्व मंत्री कोरोनामुक्त झाले होते. पण कोरोनाबाधीत झाल्यामुळे काही काळासाठी मंत्र्यांच्या कामावर परिणाम झाला. याच कारणामुळे महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधी आता कोरोना होऊ नये यासाठी जास्त काळजी घेत जनतेच्या संपर्कात आहेत.
महाराष्ट्रात आतापर्यंत ११ लाख ८८ हजार १५ जणांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी २ लाख ९७ हजार ४८० कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण अद्याप उपचार घेत आहेत. कोरोनामुळे राज्यात ३२ हजार २१६ जणांचा तर कोरोनाची बाधा झालेल्या ३८६ जणांचा इतर कारणांमुळे मृत्यू झाला. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांपैकी ८ लाख ५७ हजार ९३३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यूदर २.७१ टक्के आहे.







