राजीव सातव यांच्यासह राज्यसभेतील ८ खासदार निलंबित

नवी दिल्ली – राज्यसभेत काल (दि.२०) गोंधळ घालून गैरवर्तन केल्याप्रकरणी विरोधी पक्षाच्या ८ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. डेरेक ओ ब्रायन, संजय सिंह, राजीव सातव, के के रागेश, रिपून बोरा, डोला सेना, सय्यद नाजीर हुसैन, इलामारन करीम अशी निलंबित केलेल्या खासदारांची नावे आहेत. त्यांच्यावर एक आठवड्यासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
कालचा दिवस राज्यसभेसाठी हा एक वाईट दिवस होता. काही सदस्यांनी संसदीय शिष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आणि त्यामुळे सभागृहाची प्रतिष्ठा कमी झाली, अशा शब्दांत राज्यसभा सभापती एम. वैंकय्या नायडू यांनी खंत व्यक्त केली.
कृषी क्षेत्राशी संबंधित दोन विधेयकं काल राज्यसभेत मंजूर करण्यात आली. यावेळी विरोधकांनी प्रचंड गदारोळ घातला पण आवाजी मताद्वारे दोन्ही विधेयकांना मंजुरी देण्यात आली. कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या भाषणावेळी विरोधी पक्षातील खासदारांनी जोरदार गोंधळ घातला. खासदारांनी नियमावलीचं पुस्तक फाडून ते उपसभापतींच्या दिशेने भिरकावले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here