राष्ट्रवादी प्रवेशाच्या सर्व चर्चांना नाथाभाऊंनी दिला पूर्णविराम…

संग्रहित छायाचित्र
  • दिवसभर उलटसुलट चर्चा
  • राजकीय वर्तुळात खळबळ
  • नाथाभाऊ भाजपा सोडणार नाही – भाजपा नेत्यांनी व्यक्त केला विश्वास

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या आजच्या नाथाभाऊंच्या राष्ट्रवादीत प्रवेशाच्या बातमीने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. दिवसभर उलटसुलट बातम्या आणि चर्चांना ऊत आला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवारांच्या अध्यतेखाली पार पडलेल्या बैठकीत एकनाथराव खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर चर्चा झाल्याचंही बोललं जात होतं. राष्ट्रवादी काँग्रेसकडून याबाबत मात्र कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. दरम्यान आता नाथाभाऊंनी स्वत: यावर भाष्य करत दिवसभर रंगलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
नाथाभाऊंना राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशावरुन सुरु असलेल्या चर्चेसंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “हा विषय आपल्याला माहिती नाही. ज्यांनी या विषयावर चर्चा सुरू केली त्यांनाच तुम्ही विचारा”. दरम्यान भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथराव खडसेंना दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली, तरी ते भाजप सोडून जाणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला आहे. “दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली, तरी खडसेंचा डीएनए त्यांना दुसऱ्या पक्षात जाऊ देत नाही,” असं ते म्हणाले आहेत. “खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे नेते आहेत. ‘जिना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ…’ खडसे हे भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही. हा कार्यकर्ता म्हणून एक विश्वास आहे. संवादाच्या माध्यमातून प्रश्न सुटतील,” असा विश्वासही सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
एकनाथराव खडसे यांच्याबाबत कोणतीही चर्चा आजच्या बैठकीत झाली नाही. बैठकीत जळगाव जलसिंचन प्रकल्पाबाबत चर्चा झाली,” अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. तसंच एकनाथराव खडसेंच्या नाराजीबाबत त्यांच्या पक्षाने विचार करावा, असा सल्ला यावेळी त्यांनी दिला. सोबतच राजकारणात जर-तरला महत्त्व नसते असं सांगत एकनाथराव खडसेंच्या पक्षप्रवेशाचं वृत्त फेटाळलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here