जळगाव जिल्ह्यातील तापी नदीला महापूर : हतनूर धरणाचे २२ दरवाजे १ मीटरने उघडले

जळगाव तापी नदी हतनूर धरण

जळगाव (संपादक सुनील पाटील) | गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्हा आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तापी नदीला मोठा पूर आला आहे. तापी नदीचे उगमस्थान असलेल्या मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे उगम क्षेत्रातून पाण्याचा प्रचंड आवक होत आहे. परिणामी तापी नदीच्या जलस्तरात कमालीची वाढ झाली असून या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्यातील महत्त्वाच्या हतनूर धरणाचे तब्बल २२ दरवाजे १ मीटरने उघडले आहेत.

हतनूर धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने पावले उचलण्यात आली आहेत. सद्यस्थितीत धरणामधून ४९,००० क्युसेक वेगाने पाण्याचा मोठा विसर्ग तापी नदीच्या पात्रात सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात असल्याने तापी नदीचे पात्र पूर्णपणे दुथडी भरून वाहत असून, नदीला पुराचे रौद्र रूप प्राप्त झाले आहे.

तापी नदीला आलेल्या महापुरामुळे प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा तीव्र इशारा (Alert) देण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात उतरू नये, तसेच आपल्या सुरक्षेसह गुरेढोरांची योग्य काळजी घ्यावी, असे जाहीर आवाहन प्रशासनाने केले आहे.

पूरपरिस्थितीवर चोवीस तास बारीक लक्ष ठेवण्यासाठी महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाची विशेष पथके नदीकाठच्या भागात तैनात करण्यात आली आहेत. सध्यातरी पूरपरिस्थिती पूर्णपणे प्रशासनाच्या नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे सांगण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here