नवी दिल्ली (उपसंपादक तहरीम वाहिद) – कृषी क्षेत्रातील बदलांमुळे शेतकरी आत्मनिर्भर होतील असा विश्वास केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसने स्वामीनाथन रिपोर्टची अमलबजावणी केली नाही, पण मोदी सरकारने अमलबजावणी केली तसंच मुलभूत आधारभूत किंमत १.५ टक्क्यांनी वाढवून दिली असंही त्यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी राजकीय फायद्यासाठी नाही तर देशहितासाठी काम करत असल्याचं स्मृती इराणी यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं.
“काँग्रेसने सत्तेत असताना १० वर्षात स्वामीनाथन रिपोर्ट अमलात आणला नाही. मोदी सरकारने रिपोर्टची अमलबजावणी केली आणि मुलभूत आधारभूत किंमत १.५ टक्क्यांनी वाढवून दिली. शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत १० कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात ९० हजार कोटींहून जास्त रक्कम पाठवण्यात आली,” असं स्मृती इराणी यांनी सांगितलं आहे.
“नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाच्या आपल्या सहा वर्षांच्या कार्यकाळात राजकीय फायद्यासाठी नाही तर देशहितासाठी काम केलं आहे. विधेयकामुळे शेतकरी आपल्या उत्पन्नाचा व्यापार करु शकणार आहेत. शेतकऱ्यांची जमीन सुरक्षित राहत असून, व्यापारी तीन दिवसात शेतकऱ्यांचे पैसे अदा करतील याची खातरजमा होत आहे. मग विरोधक विधेयकाला विरोध का करत आहेत?,” अशी विचारणा स्मृती इराणी यांनी केली आहे.







