मुंबई (हितेश मिस्त्री) – अनेकदा आपल्या अदांमुळे तसेच फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेत राहणारी मॉ़डेल, अभिनेत्री पूनम पांडे हिने कोरोना संकट सुरू असताना जुलै महिन्यात साखरपुडा आणि सप्टेंबर महिन्यात लग्न केले होते. तिने बॉयफ्रेंड सॅम बॉम्बे याच्यासोबत लग्न केल्याचे इन्स्टाग्रामवर काही फोटो टाकून जाहीर केले होते. आता हे लग्न वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसत आहे.
लग्नानंतर गोव्याला गेलेल्या पूनम पांडेने सॅम बॉम्बेविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. तक्रारीआधारे गोवा पोलिसांनी पूनम पांडेचा नवरा सॅम बॉम्बे याला अटक केली. सॅमला मंगळवारी अटक करण्यात आली, त्याच्यावर पूनमने शारीरिक छळ, मारहाण, छेड काढणे आणि धमकी देणे अशा स्वरुपाचे गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी महिलेची तक्रार असल्यामुळे कायद्यानुसार तातडीने कारवाई केली. या प्रकरणात चौकशी सुरू आहे. चौकशीअंती पुढील कायदेशीर कारवाई होणार आहे.
गोव्याच्या दक्षिण भागात काणकोण येथे पूनम शूटिंगच्या निमित्ताने आली होती. तिथेच सॅम बॉम्बेने गैरवर्तणूक केली. सॅमने छेड काढली, विरोध दर्शविला म्हणून शारीरिक छळ केला, मारहाण केली तसेच धमकी दिली; असे पूनमने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी पूनमच्या तक्रारीआधारे सॅम बॉम्बेला अटक केल्याची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर तुकाराम चव्हाण यांनी दिली. कायद्यातील तरतुदीनुसार महिलेची तक्रार असल्यामुळे तातडीने कारवाई करण्यात आली आहे, आता पूनमची वैद्यकीय तपासणी केली जाईल. या तपासणीचा अहवाल आणि पोलीस चौकशी या आधारे पुढील कायदेशीर कारवाई होईल, असे इन्स्पेक्टर तुकाराम चव्हाण यांनी सांगितले.
बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेत असते. तिचा बोल्ड अवतार चाहत्यांना आवडतो. तीस लाख युझर तिला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात.
याआधी २०११ मध्ये पूनम पांडे सर्वाधिक चर्चेत आली होती. पूनमने भारत वर्ल्ड कप जिंकला तर न्यूड होणार असे जाहीर केले होते. बीसीसीआयने नकार दिल्यानंतर आणि लोकांनी नाराजी व्यक्त केल्यावर तिने असे काही केले नाही. पण घोषणा केल्यानंतर काही दिवसांतच तिने बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले. पूनम पांडेने आपल्या कामाची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. ‘नशा’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने टीव्हीवर २०१५मध्ये एक कार्यक्रम केला होता.
सतत चर्चेत राहणारी पूनम पांडे सॅम बॉम्बेविरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. याआधी कोरोना संकटामुळे लॉकडाऊन सुरू असताना पूनम वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. लॉकडाऊन काळात कोणत्याही कामाशिवाय बाहेर भटकण्यास बंदी होती. पूनमने या बंदीचे उल्लंघन करुन बीएमडब्ल्यू कारमधून मरिन ड्राईव्ह परिसरात फेरफटका मारला होता. मरिन ड्राईव्ह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये पूनमची कार दिसताच पोलिसांनी कारवाई केली.
लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लघन केल्याप्रकरणी मॉडेल पूनम पांडेविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला, तसेच तिची कार जप्त केली. पूनमविरोधात आयपीसीच्या कलम २६९, १८८ आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी पूनम आणि तिचा मित्र सॅम (४६) या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पूनमने तिच्या मित्रासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. काही दिवसांपूर्वी पूनमने चेहऱ्याला मास्कप्रमाणे रुमाल गुंडाळून सॅमला किस करत असल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. पूनम सिनेमात कमी पण हॉट वर्तनामुळे आणि कायद्यांचे उल्लंघन केल्यामुळे सतत चर्चेत असते. सोशल मीडियावर पूनमच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. यावेळी पूनम नवऱ्याविरोधात केलेल्या तक्रारीमुळे चर्चेत आली आहे. या प्रकरणात पुढे काय घडणार याकडे पूनम पांडेच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.







