मुंबई (गणेश तळेकर) – लॉकडाऊनंतर सिनेसृष्टीतील काम पुन्हा सुरू झालं असलं तरी अडचणी वाढताना दिसत आहेत. मालिकांच्या शूटिंग दरम्यान अनेक कलाकारांनी कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेतील मुख्य अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांना देखील कोरोनीची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
निवेदिता यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर मालिकेचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. निवेदिता यांना कोणतीही लक्षणं जाणवत नसल्यानं त्या घरीच क्वारंटाइन झाल्या आहेत. निवेदिता यांना कोरोनाची लागण झाल्याचं कळताच सेटवरील इतर कलाकारांनी देखील कोव्हिड चाचणी करण्यात आली.
तेजश्री प्रधान, आशुतोष पत्की, गिरीश ओक या मुख्य कलाकारांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती आहे.निवेदिता या पूर्ण बऱ्या झाल्यानंतरच त्या मालिकेच्या शूटिंगमध्ये सहभागी होतील, मात्र दोन दिवसांनी मालिकेचं शूटिंग पुन्हा सुरू होईल, असं निर्मात्यांनी म्हटलं आहे.







