सातारा (निवासी संपादक सोमनाथ जाधव) – भारतीय स्वातंत्र्य संग्रामातरील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व प्रतिसरकार मधील रहिमतपूर गटाचे प्रमुख सोपानराव घोरपडे (आप्पा) यांचे वयाच्या 101 व्या वर्षी रहिमतपूर येथे निधन झाले. प्रतिसरकारच्या चळवळीतील सातारा जिल्ह्यातील अखेरचा दुवा घोरपडे आप्पांच्या निधनाने निखळला.
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखालील प्रतिसरकार चळवळीमध्ये ते सक्रिय सहभागी होते. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात त्यांना अनेक वेळा कारावास भोगावा लागला. 1936 ते 1938 या कालावधीत त्यांनी विद्यार्थी संघटना स्थापन करून विद्यार्थ्यांमध्ये व जनतेमध्ये स्वातंत्र्याचे बीज रोवण्याचे काम केले.
शेतकरी कामगार पक्ष आणि त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात काम केले. परंतु, राजकारणापेक्षा समाजातील कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी त्यांनी मोठे कार्य केले. सातारा येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. चले जाव चळवळीचे सातारा येथे स्मारक होण्याबाबत ते नेहमीच आग्रही होते. त्यासाठी त्यांनी सरकार दप्तरी प्रयत्न केले होते. सातारा जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संग्राम संघटनेचे ते अध्यक्ष होते.







