मुंबई (हितेश मिस्त्री) – मराठा आरक्षणावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला आहे. मराठा आरक्षणाची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असल्याचे त्यांनी म्हटलेआहे. राज्य सरकारने पूर्ण प्रयत्न केलं तरच राज्यातील मराठा समाज शांत होईल. अन्यथा त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. दरम्यान, दानवे यांनी ओबीसी आरक्षणावरून सूचक इशारा दिला आहे. कोणत्याही समाजाचं आरक्षण कमी करुन मराठा समाजाला आरक्षण देणार असेल तर त्याचे काय परिणाम होतील याचा विचार केला पाहिजे असे दानवे म्हणाले.
मराठा समाजाच्या आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारवर टीका करण्यात येत आहे. आज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली हे ठाकरे सरकारचे अपयश आहे. सरकारने योग्य पद्धतीने बाजू मांडली असती तर मराठा समाजावर आंदोलन करण्याची वेळ आली नसती. असा आरोप केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे केला.







