शेती पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता
नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – शहादा तालुक्यातील पुसनद येथे एका शेतात जीवघेण्या रासायनिक द्रव्याचा साठा अनधिकृतपणे करण्यात येत असून त्यामुळे तेथील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे तरी या संदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे विषयी अधिक चौकशी करण्यासाठी तक्रार केली आहे.
गुजरात राज्यातून मध्यरात्री कंटेनरने हे जीवघेणे रासायनिक द्रव्य या शेतात आणले जात आहे. हे रासायनिक द्रव्य एवढे घातक आहे की त्या शेताच्या परिसरातील नागरिकांना रसायनाच्या उग्र वासामुळे वायू प्रदूषण होऊन श्वसनाचा त्रास होत आहे.मोठमोठी झाडे जळून नैसर्गिक जीवजंतू मृत्युमुखी पडत आहेत.या शेतात 100 फुटाचा खड्डा खोदून त्यामध्ये रसायन ओतलं जात आहे. त्यामुळे हे रसायन जमिनीत झिरपून आसपासच्या जमिनीची प्रत सातत्याने खालावत आहे. सदर रसायन जमिनीतील पाण्यात मिसळत असून विहिरी व बोअरवेलचे पाणी लालसर रंगाचे येत आहे. त्यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.
रसायनाच्या तीव्रतेने बोरवेलच्या वायरिंग सुद्धा जळून खाक होत आहेत. गुजरात राज्यातून एखाद्या केमिकल फॅक्टरीचे हे वेस्टेज या शेतात डंपिंगसाठी आणले जात असावे असा अंदाज आहे. विषयी पुसनद येथील प्रगतीशील शेतकरी अरविंद पाटील हे पाठपुरावा करत असून या जीवघेण्या रसायनाची चौकशी करण्यासाठी शासन दरबारी खेटे घालत आहेत. आधीच कोरोना महामारी मुळे परीसरातील नागरिक त्रस्त आहेत तसेच ज्या शेतात या रसायनाचा साठा केला जात आहे त्या शेतकऱ्याने कुठलीही शासकीय परवानगी घेतलेली नसून या रसायनाचा उपयोग कशासाठी करण्यात येणार आहे याविषयी कुणालाही माहिती नाही.
भविष्यात या रसायनांमुळे शेतीव्यवसायाला व शेजारील गावकऱ्यांना एखाद्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते यात तिळमात्र शंका नाही. तरीही प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून या रसायनाची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. हे रसायन गुजरात राज्यातून कोणत्या कंपनीचे आहे? व ते याठिकाणी का आणले जात आहे? असा प्रश्न निर्माण होतो. हे रसायन केवळ रात्रीच्या अंधारातच का आणली जात आहे? हे देखील एक गुढ आहे. ज्यांच्या शेतात या रसायनाचा साठा केला जात आहे त्या शेती मालकाला याविषयी कुठलीही माहिती नसल्याचे ते सांगतात. परंतु ” रात्रीस खेळ चाले ” या उक्तीप्रमाणे रात्रीच्या अंधारात काही काळेबेरे तर चालत नाही ना ?अशी शंका परिसरातील नागरिकांना आहे.
याविषयीचे निवेदन जिल्हाधिकारी प्रांत तहसीलदार यांना देण्यात आली असून कारवाईसाठी विलंब होतांना दिसत आहे. एखादा गंभीर प्रसंग घडल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही का? एखाद्या विघातक कृत्यासाठी देखील त्याचा वापर होऊ शकतो. आहे.एकीकडे अति पावसामुळे नैसर्गिक संकट तर दुसरीकडे जीवघेण्या रसायनांमुळे मानव निर्मित संकटाचा सामना करावा लागू शकतो.तरी प्रशासनाने संबंधित विभागाला चौकशीसाठी लवकरात लवकर पाचारण करावे तसेच सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या व त्यांना सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे.








