मेहरुण स्मशानभूमीच्या रस्त्याची दूरावस्था
जळगाव (संपादक सुनिल पाटील) – मृत्यूनंतर सगळं संपतं असं म्हणतात. कधी कधी मृत्यूनंतरही उपेक्षा थांबत नाही, असंच घडतय जळगावच्या मेहरुण स्मशानभूमीत. शहरातील रस्त्यांनी जळगावकरांचे जीवन खडतर केले आहे. मात्र जिथे जीवन संपते तिथे जाणारा मार्गाचीदेखील दुरावस्था झाल्याने, जळगावकरांच्या अंतिम यात्रेचा रस्ताही खडतर झाला आहे.
जळगावच्या शहर महानगरपालिकेच्या हद्दीत मेहरुणची स्मशानभूमी येते. सद्यपरिस्थितीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांसाठी नेरीनाक्याजवळील वैकुंठधाम ही स्मशानभूमी राखीव झाल्याने, शहरातील ७५ टक्के अंत्यसंस्कार मेहरुणच्या स्मशानभूमीत होत आहेत. रोज होणाऱ्या मृत्यूमुळे येथील ओटेदेखील अपूर्ण पडत आहेत. मात्र अंतिम यात्रा आणण्यासाठी मेहरुणच्या स्मशानभूमीला जाणारे दोन्ही बाजूच्या रस्त्यांची दुरावस्था झाल्याने, अंत्ययात्रा स्मशानपर्यंत पोहचण्यासाठी नातेवाईकांना कसरत करावी लागत आहे.
जळगाव शहराचे आमदार, महानगरपालिकेचे आयुक्त, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते, गटनेते, नगरसेवक यांनी या समस्येकडे त्वरित लक्ष द्यावे, अन्यथा महानगरपालिकेच्या गेटवर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समस्त जळगाववासियांच्यावतीने माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांनी दिला आहे.







