भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नाशिक कुंभमेळा रद्द करुन, ३५ हजार कोटींचा निधी दुष्काळ निवारणासाठी वापराला – राजेंद्र गाडगीळ

राजेंद्र गाडगीळ

जळगाव (संपादक सुनिल पाटील) । महाराष्ट्रात ‘एल निनो’च्या तीव्र प्रभावामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व व भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी नाशिक कुंभमेळा रद्द करावा अथवा तो केवळ साध्या धार्मिक परंपरेपुरता मर्यादित ठेवावा आणि त्यासाठी प्रस्तावित असलेला तब्बल ३५ हजार कोटी रुपयांचा निधी दुष्काळ निवारण, शेतकरी-पशुधन रक्षण व रोजगार निर्मितीसाठी तातडीने वळवण्यात यावा, अशी आग्रही मागणी पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ यांनी राज्य शासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यातील शेती पिके पूर्णपणे करपून गेली असून पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि अन्नधान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. धरणांतील खालावलेल्या पाणीसाठ्यामुळे शहर व ग्रामीण भागात पाणीटंचाईचे भीषण सावट असून उद्योगांवर तसेच जलविद्युत निर्मितीवरही विपरीत परिणाम होऊन वीजटंचाई व कामगार कपातीची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे राज्यातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य जनता पाण्यासाठी व रोजगारासाठी टाहो फोडत असताना आणि पशुधनाचा जीव धोक्यात आला असताना, कुंभमेळ्यासारख्या आयोजनावर ३५ हजार कोटींचा अवाढव्य खर्च करणे हे मानवता आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून मुळीच योग्य ठरणार नाही, असे गाडगीळ यांनी म्हटले आहे.
या गंभीर संकटाचा सामना करण्यासाठी शासनाने कुंभमेळ्याचा ३५ हजार कोटींचा निधी थेट दुष्काळ निवारणाकडे वळवावा, ग्रामीण भागात मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार हमी योजना (रोहयो) तातडीने प्रभावीरित्या सुरू करावी, टंचाईग्रस्त भागांत मोफत शासकीय टँकरने पाणीपुरवठा करावा, राज्यभरात मोफत चारा छावण्या उभारून चारा उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, तसेच दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे कृषी वीजबिल पूर्णपणे माफ करून बँकांची पीककर्ज वसुली तत्काळ स्थगित करावी, अशा प्रमुख मागण्या राजेंद्र गाडगीळ यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत. माणसांचे प्राण, रोजगार आणि मुक्या जनावरांचे रक्षण हेच शासनाचे पहिले कर्तव्य असून राज्य सरकारने यावर तातडीने दिलासादायक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here