सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: सराईत दुचाकीचोर गजाआड; ७.७० लाखांच्या २२ मोटारसायकली जप्त

सोलापूर

सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) | सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत आंतरजिल्हा सराईत दुचाकीचोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून तब्बल ७ लाख ७० हजार रुपये किमतीच्या एकूण २२ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.

या कारवाईमुळे सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. नातेपुते येथून आरोपीला अटकसोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील वाहनचोरीच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवून गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करण्यात आली होती.
दरम्यान, मोहोळ तालुक्यातील पेनूर येथून मोटारसायकल चोरणारा रेकॉर्डवरील आरोपी नामदेव बबन चुनाडी (रा. अनिल नगर, पंढरपूर) हा नातेपुते येथे असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या पथकाला मिळाली. पोलिसांनी तातडीने सापळा रचून त्याला नातेपुते येथून ताब्यात घेतले. कौशल्याने तपास आणि गुन्ह्यांची कबुलीताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
त्याने पेनूर येथून चोरलेली युनिकॉर्न मोटारसायकल गणेश ऊर्फ नाना साबळे (रा. राऊत नगर, अकलूज) याला विकल्याचे सांगितले. अधिक तपासात त्याने मोहोळ, टेंभूर्णी, अक्कलकोट, सोलापूर शहर यासह पुणे, सातारा, सांगली, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांतून विविध कंपन्यांच्या दुचाकी चोरल्याचे उघड केले. २२ मोटारसायकली हस्तगतचोरी केलेल्या गाड्यांपैकी चार दुचाकी तुषार अनिल चव्हाण (रा. अकलूज) याला दिल्या होत्या, तर उर्वरित १७ दुचाकी त्याने स्वतःकडे ठेवल्या होत्या. पोलिसांनी नामदेव चुनाडी, गणेश साबळे व तुषार चव्हाण यांच्याकडून ७ लाख ७० हजार रुपये किमतीच्या एकूण २२ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. यातील १७ मोटारसायकलींवर विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले असून उर्वरित ५ वाहनांबाबत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक (पंढरपूर) प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, सपोनि विजय शिंदे, पोलीस अंमलदार रवी माने, अतुल घाडगे, दशरथ गोरे, महिला पोलीस हवालदार सुनंदा झळके, अनवर अत्तार, प्रमोद गायकवाड, मनोज राठोड, सागर ढोरेपाटील व चालक पोलीस शिपाई वगरे यांनी केली. गुन्हे शाखेच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here