अजिंठा चौफुलीवरून चोरी गेलेली दुचाकी हस्तगत; एमआयडीसी पोलिसांकडून चोरट्याला बेड्या

एमआयडीसी पोलिस

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) | शहरातील अजिंठा चौफुली परिसरातून चोरीला गेलेली दुचाकी शोधण्यात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मोठे यश आले आहे. पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत गुन्ह्याचा छडा लावत मूळ मध्य प्रदेशातील एका संशयिताला अटक करून त्याच्याकडून चोरीची मोटारसायकल जप्त केली आहे.

शेरा चौक (रझा कॉलनी, मेहरुण) येथील रहिवासी रमजान खान बाबु खान यांनी १२ सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास आपली काळ्या रंगाची ‘स्प्लेंडर प्लस’ दुचाकी (क्र. MH-19 DY 4874) अजिंठा चौफुली येथील इदगाह कॉम्प्लेक्ससमोर पार्क केली होती. वैयक्तिक कामावरून परत आल्यानंतर त्यांना गाडी जागेवर मिळून आली नाही. दुचाकी चोरीस गेल्याचे लक्षात येताच त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध बीएनएस कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. पथकाने घटनास्थळावरील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेतला. या माहितीनुसार २३ सप्टेंबर रोजी संशयित आरोपी तुलसीराम काल्यासिंग कास्दे (वय २८, मूळ रा. झाकस, ता. भैसदेही, जि. बैतुल, मध्य प्रदेश; सध्या रा. सुप्रीम कॉलनी, शारदा कॉलनी, जळगाव) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरीला गेलेली स्प्लेंडर प्लस मोटारसायकल जप्त केली आहे. न्यायालयाने आरोपीला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप चौधरी करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, ग्रे.पो.उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल रमाकांत साळुंखे, शशिकांत मराठे आणि योगेश घुगे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here