जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) | भोजलिंग काका महामंडळाच्या योजनांतून समाजातील युवक आणि नागरिकांनी पुरेपूर लाभ घेऊन स्वावलंबी बनावे व आपली आर्थिक उन्नती साधावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विश्वकर्मा सुतार समाज समन्वय समितीचे प्रवर्तक तथा मुख्य समन्वयक प्रा. विद्यानंद मानकर यांनी केले. आपल्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त त्यांनी जळगाव येथील विश्वकर्मा पांचाळ सहाय्यक बोर्डिंगला सदिच्छा भेट देऊन समाज बांधवांशी हितगुज केले, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री विश्वकर्मा पूजन व महाआरतीने झाली. याप्रसंगी प्रा. मानकर यांनी भोजलिंग काका आर्थिक विकास महामंडळाच्या विविध कल्याणकारी योजना, व्यवसाय कर्ज व अनुदानाविषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. समाजाने संघटित होऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे, अशी सादही त्यांनी यावेळी घातली. कार्यक्रमादरम्यान जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजसेवक एम. टी. लुले (बाबा) यांच्या हस्ते प्रा. विद्यानंद मानकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या मेळाव्याला पुणे येथील ग्रंथमित्र रमेशराव सुतार, संतोष भागवत, विठ्ठल गरूड, छत्रपती संभाजीनगरचे भागवतदादा पांचाळ, ॲड. हेमंत जाधव, तसेच धुळे येथील पी. जी. सुतार, दीपक शेलार व डॉ. नितीन कापडणीस आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी दीपक खैरनार, प्रमोद रूले, गोपाल लुले, मनोहर रूले, संजय दीक्षित यांच्यासह समाज बांधवांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत रूले यांनी केले, तर आभार प्रदर्शन गोपाल लुले यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.







