संपत्तीच्या वादातून ठाण्यात नगरसेवकाच्या मुलाची हत्या

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) – संपत्तीच्या वादातून ठाण्यात शिवसेनेचे नगरसेवक माणिक पाटील यांच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. राकेश पाटील असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे .त्याचा खून सावत्र भाऊ सचिन पाटील याने केल्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सचिन पाटीलचा साथीदार गौरव सिंह याला अटक केली आहे.

शिवसेनेचे माणिक पाटील हे श्रीनगर भागातील नगरसेवक आहेत. त्यांचे घर घोडबंदर रोडवरील वाघबिळ गावात आहे. काही दिवस आधी, ते त्यांच्या पत्नीसह उपचारासाठी एका रुग्णालयात दाखल होते. 20 सप्टेंबरला उपचार करून घरी आल्यानंतर त्यांना घरातील तिजोरी फोडल्याचे आढळले. तसेच त्यांचा मुलगा राकेश याचा शोध घेतला असता तो दिसून आला नाही. तिजोरीतील साडे तीन किलो सोने देखील गायब असल्याचे आढळले.

याप्रकरणी माणिक पाटील यांनी राकेश बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू असताना राकेशचा खून झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून गौरवला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने संपत्तीसाठी सचिनने राकेशच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here