५ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी सत्याग्रहाची घोषणा
जळगांव (संपादक सुनिल पाटील) – समाजात जातीनिहाय लोकसंख्या कळाली, तर संबंधित वर्गाला किती आरक्षण द्यायचे ही बाब स्पष्ट होते. ओबीसी जनगणना होणे काळाची गरज असून, त्यास राजकीय रंग द्यायला नको. सर्वसामान्य जनतेनेही या मागणीला पाठिंबा द्यायला हवा.ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी लोकजागरचे अध्यक्ष ज्ञानेश वाकुडकर यांनी केली आहे.
यावेळी त्यांनी सांगितले की, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी ही जनतेची मागणी असून, सरकार मात्र टाळाटाळ करते. देशात कोंबडे, बकऱ्या, गाय, बैल, कुत्री, गाढव यांची गणना केली जाते पण ओबिसींची मात्र १९३१ नंतर जनगणना केली गेली नाही. याचा अर्थ नेमका काय ?
ओबीसी या देशाचे नागरिक नाहीत का ? ओबीसी म्हणजे प्रस्थापित पक्षांचे गुलाम आहेत का ? ओबीसी म्हणजे निवडणुकीपुरते वापरण्यात येणारे राजकीय पायपुसणे आहे का ? ओबीसींची किंमत कुत्र्या – मांजरापेक्षाही कमी आहे का ? ओबीसींची जनगणना होऊ न देण्यामागे कुणाचे कारस्थान आहे ? कुणाला, कशाची भीती वाटते ? ओबीसींची जनगणना झाल्यामुळे कुणा कुणाची सरंजामशाही धोक्यात येणार आहे ? ओबिसीच्या हक्काचे छुपे विरोधक कोण ? खुले विरोधक कोण ? समतेचे, न्यायाचे, लोकशाहीचे मारेकरी कोण ? आदी प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
ते पुढे म्हणाले की, स्वतंत्र जनगणना झाली तर महाराष्ट्रात जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी साठी संखेच्या प्रमाणात ( किमान ५२ टक्के ) राखीव जागा निर्माण होतील. संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी, बहुजनांची सत्ता येईल..! समतावादी आणि सर्वसमावेशक राजकारणाचे नवे पर्व सुरू होईल ! ओबीसी साठी बजट मध्ये वेगळी तरतूद करण्याचा दबाव वाढेल. शिक्षण, नोकऱ्या, प्रमोशन इत्यादी बाबीवर सकारात्मक प्रभाव पडेल. नव्या दमाचे युवा नेतृत्व उदयास येईल. घराणेशाहीचे बुरुज ढासळतील. तेव्हा.. लाचारी सोडा ! संघटित व्हा !! सत्याग्रह करा !!! स्वतःपासून..घरापासून सुरुवात करा ! मोहोल्ल्या पासून सुरुवात करा..स्वतःच्या गावापासून सुरुवात करा !!! ५२ टक्के ओबीसींना ५२ टक्के आरक्षण, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी.
या मागणीसाठी ५ ऑक्टोबर रोजी सत्याग्रहाची अधिकृत घोषणा आणि सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. संपूर्ण शक्तिनिशी या राज्यव्यापी सत्याग्रहात सहभागी व्हा..! सत्याग्रही म्हणून आपले नाव नोंदवा.. आपल्या संस्थेचे किंवा संघटनेचे नाव नोंदवा ! एकमेकांना सहकार्य करा, असे आवाहनही त्यांनी केले.







