ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांची जय्यत तयारी; शांतता समितीची बैठक संपन्न

ईद-ए-मिलाद

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) :आगामी ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, शांतता व सलोखा टिकवण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जळगाव पोलीस मुख्यालयात शांतता समिती सदस्य व मिरवणूक पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली.

या बैठकीस जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त, उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO), उपविभागीय दंडाधिकारी (SDM) व सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. मिरवणुकीसाठी प्रशासनाच्या प्रमुख सूचना :पूर्वपरवानगी अनिवार्य : मिरवणूक काढण्यासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असून, निश्चित केलेल्या मार्गात कोणताही बदल करता येणार नाही. आक्षेपार्ह घोषणा व ध्वजांवर बंदी : मिरवणुकीत आक्षेपार्ह गाणी, वादग्रस्त घोषणा तसेच परदेशी व वादग्रस्त ध्वजांचा वापर करण्यास पूर्णपणे मनाई असेल. झेंडे फिरवण्यास मनाई : वाद टाळण्यासाठी मिरवणुकीदरम्यान झेंडे फिरवणे टाळावे व आयोजकांनी आवश्यकतेनुसार स्वयंसेवकांची नियुक्ती करावी. धार्मिक भावना दुखावणारे संदेश, फोटो अथवा व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवर सायबर सेलद्वारे कठोर कारवाई केली जाईल. नागरी सुविधांची खबरदारी : महावितरणने उघडे डीपी बंदिस्त करावेत तसेच मनपा प्रशासनाने मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवून रस्ते अतिक्रमणमुक्त ठेवावेत. ५ हजारांहून अधिक प्रतिबंधात्मक कारवाया
सण शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यात ५,००० पेक्षा जास्त प्रतिबंधात्मक कारवाया केल्या असून संवेदनशील भागात रूट मार्च आणि दंगल काबू प्रात्यक्षिके (रिहर्सल) पूर्ण केली आहेत. तसेच मिरवणूक व गर्दीच्या ठिकाणी निगराणीसाठी ड्रोन कॅमेरे व सायबर मॉनिटरिंगचा वापर केला जाणार आहे. तगडा पोलीस बंदोबस्त तैनात :
शांततेसाठी जिल्ह्यात १ पोलीस अधीक्षक, २ अपर पोलीस अधीक्षक, १० SDPO, २ प्रोबेशनरी DySP, ३० पोलीस निरीक्षक, २०० API/PSI, ३,४०० पोलीस अंमलदार, १,६०० होमगार्ड, २०० SRPF कमांडो, ८ RCP पथके, १५ स्ट्रायकिंग फोर्स, २ BDDS पथके, ४ श्वान पथके (Dog Unit) आणि १०० वाहतूक पोलीस तैनात राहणार आहेत. शांतता व सलोख्याचे आवाहन
ईद हा सण शांतता, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा वाढविणारा सण असून नागरिकांनी तसेच आयोजकांनी प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देत पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here