धक्कादायक! २०१९ साली देशात होत होते दररोज ८७ बलात्कार

mahila-atyachar

नवी दिल्ली – उत्तरप्रदेशातील हाथरस येथे एका मुलीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देशाला हादरवलं. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे आणि आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करुन शिक्षा देण्याची मागणी होत आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याच्याराच्या घटना चिंताजनक आहेत. त्याच दरम्यान राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने २०१८-१९ या वर्षात महिलांवर झालेल्या अत्याचाराची आकडेवारी जाहीर केली आहे. या रिपोर्टनुसार, महिला अत्याचाराच्या घटनेत घट झालेली नाहीये. आकडेवारीनुसार, २०१८ या वर्षात महिलांवर एकूण ३,७८,२३६ अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत.
आकडेवारीनुसार, २०१९ या वर्षात बलात्काराच्या एकूण ३२,०३३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये भारतात प्रतिदिन हत्येच्या सरासरी ७९ गुन्ह्यांची नोंद होते. २०१९ मध्ये हत्येच्या एकूण २८,९१८ गुन्ह्यांची नोंद जालेली आहे. ही आकडेवारी २०१८ मध्ये २९,०१७ इतकी होती.
एनसीआरबीच्या रिपोर्टमध्ये समोर आले आहे की, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांत वाढ होत आहे. २०१९ मध्ये दररोज बलात्काराच्या सरासरी ८७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. वर्षभरात महिलांवर झालेल्या एकूण अत्याचाराच्या घटनांची संख्या ४,०५,८६१ इतकी आहे. ही आकडेवारी २०१८ च्या तुलनेत सात टक्क्यांनी अधिक आहे.
रिपोर्टनुसार, गेल्यावर्षी बलात्काराच्या सर्वाधिक घटना हा राजस्थान आणि उत्तरप्रदेशात घडल्या आहेत. राजस्थानमध्ये बलात्काराच्या ६,००० गुन्ह्यांची नोंद झाली आहे तर उत्तरप्रदेशात ३०६५ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या दोन्ही राज्यांत महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे.
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, गेल्या १० वर्षांत मुली किंवा महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांमध्ये ४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, २०१० पासून २०१९ या कालावधीत देशभरात बलात्काराच्या तब्बल ३,१३,२८९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here