‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत पाचव्या टप्प्याला सुरुवात

dr-rajednra-bharud

काही शिथिलतेसह लॉकडाऊनच्या कालावधीत 31 ऑक्टोबरपर्यंत वाढ

नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत पाचव्या टप्प्यात काही शिथीलतेसह जिल्ह्यात 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत लॉकडाऊन सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी निर्गमित केले आहेत.
नंदुरबार जिल्हा कार्यक्षेत्रात सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, कोचिंग इन्स्टिट्यूट बंद राहतील, तथापि ऑनलाईन शिक्षणास परवानगी राहील. चित्रपट गृहे, जलतरण तलाव, करमणूक उद्याने, थिएटर (मॉल व मार्केट कॉम्प्लेक्समधील ) सभागृह, असेंब्ली हॉल यासारख्या इतर सर्व जागा बंद राहतील. सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मोठ्या संख्येने लोक प्रमाणात घेण्यात येणारे मेळावे किंवा कार्यक्रम प्रतिबंधीत असतील.
दुकाने व मार्केट रविवारीदेखील सुरू
मॉल आणि व्यावसायिक संकुल (मार्केट कॉम्प्लेक्स), दुकाने, आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहील. औषधांची दुकाने आणि खाजगी रुग्णालये पुर्णवेळ सुरू राहतील. पाचपेक्षा जास्त व्यक्ती दुकानात असल्यास किंवा सामाजिक अंतराचे पालन न केल्यास तात्काळ बंद करण्यात येतील. रविवारीदेखील दुकाने, मार्केट, आस्थापना निर्धारीत वेळेत सुरू राहतील. यापूर्वी परवानगी दिलेल्या बाबी पूर्ववत सुरू राहतील.
5 ऑक्टोबरपासून हॉटेल/रेस्टॉरंट्स सुरू
5 ऑक्टोबर 2020 पासून हॉटेल्स, फूट कोर्ट्स, रेस्टॉरंट्स आणि बार 50 टक्के क्षमतेसह किंवा स्थानिक प्रशासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे सुरू राहतील. या आस्थापनांसाठी पर्यटन विभागाकडून स्वतंत्र आदर्श कार्यप्रणाली देण्यात येईल, तिचे पालन करणे बंधनकारक राहील. ऑक्सिजन उत्पादन व वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या हालचालीस जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे वेळेचे अथवा इतर बंधन असणार नाही. सार्वजनिक ठिकाणी दारु,पान,तंबाखू इत्यादी सेवन करण्यास मनाई असेल.
मास्कचा वापर अनिवार्य
कामाचे व इतर सर्व ठिकाणी आणि प्रवास करताना चेहऱ्यावर मास्क लावणे अनिवार्य आहे. सार्वजनिक ठिकापणी दोन व्यक्तींमध्ये सहा फूटाचे अंतर ठेवावे. विवाह समारंभात शारीरिक अंतराचे पालन करून जास्तीत जास्त 50 व्यक्तींना उपस्थित राहण्यास परवानगी असेल. अंत्यविधी सारख्या कार्यक्रमास 20 व्यक्तींना शारीरिक अंतर ठेऊन परवानगी असेल.
कामाच्या ठिकाणी अतिरिक्त निर्देशाचे पालन करणे बंधनकारक
कार्यालयामध्ये, कामाच्या ठिकाणी मार्केटमध्ये, औद्योगिक तसेच व्यवसायीक आस्थापनेमध्ये गर्दी होणार नाही अशा पद्धतीने कामाचे नियोजन करावे. त्याठिकाणी हॅडवॉश, सॅनिटायझर, यांची येणाच्या व जाण्याच्या ठिकाणी व्यवस्था करावी. कामाचे ठिकाण, सार्वजनिक उपयोगाच्या जागा व सामान्य माणसाच्या वापरात येणाऱ्या सर्व जागा व वस्तू यांचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करावे.
विविध बाबीसाठी दिलेली मुभा प्रतिबंधीत क्षेत्र वगळता आहे. आदेशाचे कोणत्याही व्यक्ती अथवा संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 नुसार नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here