शहादा (विजय निकम) – तालुक्यातील धडगाव – शहादा रस्त्यावरती म्हसावद गावाजवळ असलेल्या तोरणमाळ फाट्याजवळ बांधकाम सुरू असून त्या बांधकामाच्या पायाभरणीत भर करण्यासाठी मुरूम वापरला जात आहे परंतु यासाठी तहसील कार्यालयातून कुठलीही परवानगी न घेता अनधिकृत मुरूम साठा करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की म्हसावद गावाजवळ व्यावसायिक शॉपिंग मॉल चे बांधकाम सुरू असून या बांधकामासाठी लागणारा मुरूम हा जवळच्याच शिवारातून डंपरद्वारे विनापरवाना याठिकाणी आणण्यात आला आहे. मुरूम खोदण्यासाठी व वाहतूक करण्यासाठी लागणारा परवाना ( रॉयल्टी) संबंधित बांधकाम व्यावसायिकाने घेतलेला नसून जवळपास ५० ते ६० डंपर मुरूम साठवण्यात आला आहे.
याबाबत मंडळ अधिकारी म्हसावद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना याबाबत कुठलीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. संबंधिताने परवानगी घेतली नसून तहसील विभागाकडून तलाठी व मंडळ अधिकारी पंचनामा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अशाच प्रकारे अनेक बांधकामे परिसरात सुरू असून त्यासाठी लागणारा मुरूम हा मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून आणण्यात येत आहे.
अनधिकृत उत्खननामुळे गावाच्या भौगोलिक परिस्थितीवर याचा परिणाम होऊ शकतो असे असताना तलाठी व मंडळ अधिकारी यांना याबाबत कुठलेही सोयरसुतक नसल्याचे लक्षात येत आहे. गावातून मोठ्या प्रमाणावर डंपरने अवैध वाहतूक सुरू असून याबाबत तहसील विभागाला कुठलीही माहिती नसल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे तरी या अवैध उत्खनन व साठेबाजांवर विरुद्ध तहसील विभाग काय कारवाई करेल ? हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.







