चोपडा (नंदलाल मराठे) – येथील शारदा नगर परिसरातील रहिवाशी व तावसे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य सेवक ईश्वर
सदाशिव सैदाणे वय ४६ या कोरोना योध्याचे कर्तव्य बजवतांना दि.२८ रोजी मृत्यू झाला.
सकाळी ९ वाजेच्या दरम्यान आपल्या तावसे येथील आरोग्य केंद्रावर जाण्यास निघाले असता रस्त्यावर त्यांना घाम येऊन छातीत दुखू लागल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.उपजिल्हा रुग्णालयात डॉ.पंकज पाटील यांनी शवविच्छेदन करून त्यांचा स्वायब घेतला.जिल्हा आरोग्य अधिकारी श्री पाटोळे यांनी चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात येऊन मयताच्या कुटुंबियांची भेट घेऊन जिल्हाधिकारी यांच्यावतीने सांत्वन व्यक्त केले व या कोरोना योध्याचे अंतिम संस्कार चोपडा येथेच शासकीय नियमानुसार करण्याच्या सूचना दिल्या.न.प.चे कर्मचारी व मयताच्या मोजक्या नातेवाईक यांनी नगरपालिकाच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.
मयत कोरोना योद्धा हे धरणगाव तालुक्यातील हिंगोणा जवखेडा या गावचे होते गेल्या ८ महिन्यांपूर्वी ते सातारा येथून चोपडा येथे बदली होऊन आले होते.येथील तावसे उपकेंद्र सोबतच त्यांच्याकडे कुरवेल येथील अतिरिक्त चार्ज असल्याने त्यांना दररोज परिसरातील गावामधील लोकांची प्लस ऑक्सिमिटर तपासणी करावी लागत असल्याने कामाचा त्यांच्यावर मोठा ताण होता असे नातेवाईकांनी संबंधित पत्रकारास सांगितले. या कोरोना योद्धचा मृत्यू नेमका कोरोनामुळे झाला की हृदयविकाराने हे मात्र अहवाल आल्यानंतरच समजेल. त्यांच्या पश्चात पत्नी,मुली-२,आई-वडील,भाऊ असा परिवार आहे.
माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे,चोपडा न.प.चे गटनेते जीवनभाऊ चौधरी, अखिल भारतीय कोळी/कोरी समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजीव शिरसाठ ,आरोग्य सेवक संतोष शिरसाठ, निभोरा पोलीस पाटील गुलाबराव कोळी,साईनाथ लॉजिंग चे संचालक राधेश्याम पाटील यांनी अंत्यसंस्कार विधीसाठी परिश्रम घेतले.







