ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ग्रंथालय विभाग पदाधिकाऱ्यांनी घेतली शरद पवार यांची भेट
धरणगाव (उपसंपादक प्रा पी एन पाटील) – स्व.यशवंतरावजी चव्हाण यांच्या धोरणातून उभी राहीलेली महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळ जिवंत राहीली पाहिजे, टिकली पाहिजे व ती वृध्दींगत झाली पाहिजे म्हणून ग्रंथालय विभागाचे पदाधिकारी पायाला भिंगरी लावल्यागत कार्य करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाचे प्रदेश अध्यक्ष उमेश पाटील, प्रदेश समन्वयक रिता बाविस्कर व प्रदेश उपाध्यक्ष अक्रूर मामा सोनटक्के यांनी खा.शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन राज्यातील विविध मुद्द्यांची चर्चा केली.
सार्वजनिक ग्रंथालये अंशतः का होईना कोविड धोरणाच्या सर्व नियम,अटी पाळून चालू करणे, सार्वजनिक ग्रंथालयाचे गेल्या आठ वर्षापासून प्रलंबित असलेले अनुदान दुप्पट करणे. बरोबरच गेल्या आठ वर्षांपासून थांबवण्यात आलेली ग्रंथालयाच्या दर्जावाढीची प्रकिया चालू करणे. तसेच मागील आठ वर्षांपासून बंद केलेली नवीन सार्वजनिक ग्रंथालयांना मान्यता देण्याची प्रक्रिया चालू करणे, राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयाचा चालू वर्षातील अनुदानाचा पहिला हप्ता वितरीत करणे. सार्वजनिक ग्रंथालयाना स्वतंत्र ईमारती व्हाव्यात म्हणून शासन निर्णयात आवश्यक ते बदल करून जागा उपलब्ध करून देण्यात याव्यात. इ. मुलभूत प्रश्नाबाबत पत्र दिली मा. पवार साहेबानी लगेचंच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदयजी सामंत आणि संसदीय कामकाज मंत्री ना.अनिलजी परब आणि संबंधित खात्याचे सचिव याना पत्र देऊन सुचना केल्या. तसेच ग्रंथालय चळवळीस नियमितता प्राप्त व्हावी अनुदान वाढ करण्यात सूत्रबद्धता यावी यासाठी इतर राज्यातील ग्रंथालय कायद्याचे अवलोकन करून कायमस्वरूपी उपाय योजना सुचवण्या बाबत योग्य प्रस्ताव सादर करण्याबाबत उमेश पाटील यांनाही सुचीत केले.
यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांचीही शिष्ट मंडळाने भेट घेऊन कोरोना काळात ग्रंथालये बंद ठेवण्यात आल्याने सार्वजनिक ग्रंथालयाचे व पर्यायाने कर्मचाऱ्यांचेही बरेच नुकसान झाले आहे म्हणून किमान त्या काळातील वाचका कडून वसूल होणाऱ्या वर्गणी इतकी रक्कम मदत म्हणून ग्रंथालयाना देण्यात यावी. सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्यात यावीत. आणि इतर मागण्यांबाबत निवेदन दिले.त्यावर मा.मंत्री महोदयानी लगोलग दूरध्वनीवरून ग्रंथालय संचालक इंगोले मॅडम यांना आजच्या आज पत्र काढण्याबाबत आदेश दिले.
त्यानंतर खा.सुप्रीयाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष ना.जयंतराव पाटील यांच्याही भेटी घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस ग्रंथालय विभागाचे अध्यक्ष मा.उमेश पाटील, प्रदेश समन्वयक सौ.रिता बाविस्कर, प्रदेश उपाध्यक्ष, अक्रूर सोनटक्के,नांदेडचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील दगडगावकर आदी उपस्थित होते. यानंतर ना.प्राजक्तजी तनपूरे साहेब उच्च व तंत्रशिक्षण राज्य मंत्री यांचीही भेट घेऊन वरील सर्व मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. ना.तनपूरे साहेब यानीही संबंधित अधिकाऱ्यांना स्वतः संपर्क साधून एकंदरीत सर्वच मागण्यांबाबत सुचना दिल्या. संघटना वाढीसाठी तसेच ग्रंथालयासाठी निधी संदर्भात आरोग्य मंत्री राजेश भैय्यासाहेब तसेच नवाबजी मलिक क्रिडा मंत्री, अदिती तटकरे आणि जितेंद्र आव्हाड, हसेन मुश्रीफ, दत्तामामा भिरणे यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली.







