कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – महाविकास आघाडी सरकार “मदिरालय” उघडण्यास परवानगी देते मग “मंदिरे” उघडण्यास परवानगी का देत नाही असा सवाल करत भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा नगरसेविका अॅड. स्वाती शिंदे आणि अध्यात्मिक आघाडीचे जिल्हा संयोजक अजयकुमार वाले यांच्या नेतृत्वाखाली गणपती मंदिरासमोर टाळ, मृदुंग वाजवत अनोखे आंदोलन करण्यात आले.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाऊन केले होते. सध्याच्या घडीला परिस्थिती सुधारत असून रुग्णसंख्याही कमी होत आहे. राज्य सरकारने दुकाने, हॉटेल्स, बसेस, रेल्वे या सार्वजनिक सुविधा सुरु केल्या आहेत. सरकारला दारू विक्रीतून महसूल मिळतो म्हणून मादिरालये उघडण्यास परवानगी दिली आहे. नागरिक एकत्र आल्यास कोरोनाचा प्रभाव अधिक होऊ शकतो म्हणून सरकारने दुकानांसह सार्वजनिक ठिकाणी “कुलूपबंद” केले होते. मंदिरे, क्रीडांगणे, व्यायामशाळा उघडण्यासही बंदी घालण्यात आली आहे. सरकारने सर्वप्रथम मादिरालये उघडण्याची परवानगी दिली, परंतु धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देण्याची सरकारची इच्छा दिसत नाही. याला “उद्धवा अजब तुझे सरकार” असंच म्हणण्याची वेळ आली आहे असे मत शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अॅड. स्वाती शिंदे यांनी, राज्य सरकारने केंद्राच्या सूचनांचे पालन करून मंदिरे उघडण्यास त्वरित परवानगी द्यावी. यामध्ये भक्तांच्या भावना गुंतल्या आहेत. सरकारने परवानगी न दिल्यास भक्त स्वतःहून मंदिरात घुसतील असे सांगितले.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य हभप निशिकांत शेटे, नगरसेविका भारतीताई दिगडे, नगरसेविका उर्मिला बेलवलकर, स्मिता पवार, ज्योती कांबळे, गंगा तिडके, प्रकाशतात्या बिरजे, श्रीकांततात्या शिंदे, नगरसेवक लक्ष्मण नवलाई, विशाल पवार, उदय बेलवलकर, बाळासाहेब बेलवलकर, निशिकांत शेटे, अविनाश मोहिते, लता शहा, रुपाली देसाई, मोहन वाटवे, राजेंद्र नातू, कुमार लेंडवे, विनायक मुतालिक, महेश फोंडे, मोहन जामदार यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.








