जळगाव (संपादक सुनिल पाटील) – या वर्षी १८ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या काळात अधिक मास आहे. अधिक मास म्हणजे नेमके काय ?, या काळात व्रते आणि पुण्यकारक कर्मे करण्यामागचे शास्त्र, अधिक मासात कोणती कामे करावीत आणि करू नये, अधिक मास असता श्राद्ध केव्हा करावे ?, अधिक मासात वाढदिवस आल्यास काय करावे ? यांविषयीच्या शास्त्रीय माहितीचे विवेचन सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवचनांच्या माध्यमातून जिज्ञासूंपर्यंत पोहचवण्यात आले.
अधिक मास म्हणजे काय ?
१ अ. चांद्रमास : सूर्य आणि चंद्र यांची एकदा युती होण्याच्या वेळेपासून, म्हणजे एका अमावास्येपासून पुन्हा अशी युती होईपर्यंत, म्हणजे पुढील मासाच्या अमावास्येपर्यंतचा काळ म्हणजे ‘चांद्रमास’ होय. सण, उत्सव, व्रते, उपासना, हवन, शांती, विवाह आदी हिंदु धर्मशास्त्रातील सर्व कृत्ये चांद्रमासाप्रमाणे (चंद्राच्या गतीवरून) ठरलेली आहेत. चांद्रमासांची नावे त्या मासात येणार्या पौर्णिमेच्या नक्षत्रांवरून पडली आहेत, उदा. चैत्र मासाच्या पौर्णिमेला चित्रा नक्षत्र असते.
१ आ. सौरवर्ष : ऋतू सौरमासाप्रमाणे (सूर्याच्या गतीवरून) ठरलेले आहेत. सूर्य अश्विनी नक्षत्रापासून भ्रमण करत पुन्हा त्याच ठिकाणी येतो. तेवढ्या काळाला ‘सौरवर्ष’ असे म्हणतात.
१ इ. ‘चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यांचा मेळ बसावा’, यासाठी अधिक मासाचे प्रयोजन ! : चांद्रवर्षाचे ३५४ दिवस आणि सौरवर्षाचे ३६५ दिवस असतात, म्हणजेच या दोन वर्षांमध्ये ११ दिवसांचे अंतर असते. ‘हे अंतर भरून यावे’, तसेच चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यांचा मेळ बसावा; म्हणून स्थूलमानाने सुमारे ३२॥ (साडेबत्तीस) मासांनी एक अधिक मास धरतात, म्हणजे २७ ते ३५ मासांनी १ अधिक मास येतो.
२. अधिक मासाची अन्य नावे : अधिक मासाला ‘मलमास’ किंवा ‘धोंड्याचा महिना’ असे म्हणतात. अधिक मासात मंगल कार्याऐवजी विशेष व्रते आणि पुण्यकारक कृत्ये केली जातात; म्हणून याला ‘पुरुषोत्तम मास’, असेही म्हणतात.
जिल्ह्यात ४२ ऑनलाइन प्रवचने घेऊन उपरोक्त शास्त्रीय माहिती जिज्ञासूंपर्यंत पोहचवण्यात आली. या प्रवचनांमुळे अनेक जिज्ञासूंनी ‘आमच्या मनात अधिक मासाविषयीचे अपसमज दूर झाले असून शास्त्रीय माहिती मिळाली’, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सनातन संस्था ही धर्मप्रसार करणारी संस्था असून संस्थेच्या वतीने आगामी नवरात्रोत्सवाविषयीदेखील अशाच पद्धतीने ऑनलाइन प्रवचनांद्वारे ‘आपत्काळात नवरात्रोत्सव कसा साजरा करावा ?’ याविषयी प्रवचनांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाही जिज्ञासूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.







