पुस्तक भिशी उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी शशिकांत हिंगोणेकर यांचे प्रतिपादन
जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – ” वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रत्येक घरात ग्रंथालय असणे अत्यावश्यक आहे . ” असे प्रतिपादन निवृत्त शिक्षण उपसंचालक शशिकांत हिंगोणेकर यांनी केले . डॉ . ए .पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी जळगाव शहरात प्रथमच पुस्तक भिशी या अभिनव उपक्रमाचा प्रारंभ झाला . उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना हिंगोणेकर बोलत होते . अथर्व पब्लिकेशनच्या कार्यालयात दिनांक १५ ऑक्टोबर २०२० रोजी भिशीचा कार्यक्रम संपन्न झाला. प्रमुख अतिथी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर कट्यारे , उपक्रमाचे समन्वयक विजय लुल्हे, युवराज माळी मान्यवर उपस्थित होते.
प्रस्तावनेत समन्वयक विजय लुल्हे यांनी पुस्तक भिशीची उद्दिष्टे व कार्यवाहीची संकल्पना स्पष्ट करून पुस्तकांचे त्यांच्या जीवन संघर्षातील अनन्यसाधारण योगदान सांगितले . प्रतिमा पूजनाला फाटा देऊन पुस्तकांचे पूजन करण्यात आले . ज्येष्ठ कार्यकर्ते दिगंबर कट्यारे यांनी वाचन चळवळ हा आचार-विचार संस्कृतीचा प्राणवायू आहे असे सांगितले . पहिल्या लकी ड्रॉची सोडत चिरंजीव वेद माळी या बालकाच्या हस्ते काढण्यात आली . आवडीचे पुस्तक खरेदी करण्याचा पहिला सन्मान सुदाम बडगुजर यांना प्राप्त झाला .उपस्थित सहयोगी सभासदांना पुस्तकांचे वितरण करण्यात आले .
पुस्तक भिशीसाठी वर्षभर विविध प्रकाशनाची दर्जेदार वाचनीय पुस्तके उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अथर्व पब्लिकेशन युवराज माळी यांनी जाहीर केले . कृती संशोधनात जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त श्रीमती छाया पाटील यांचा शाल, श्रीफळ, बुके देऊन शशिकांत हिंगोणेकर यांच्या हस्ते व सद्भावना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रकार सुनील दाभाडे यांचा सत्कार दिगंबर कट्यारे यांच्या हस्ते करण्यात आला.सदरहू उपक्रम स्थापनेचा सोळा सभासदांनी पाया भक्कम केला . उपक्रमात कोणत्याही वयोगटाच्या निर्व्यसनी व सदाचारी विविध क्षेत्रातील वाचक सभासदांना सहभागी व्हावयाचे असल्यास त्यांनी विजय लुल्हे यांच्याशी या भ्रमणध्वनीवर ( ९९२३३१५२११ ) संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .
पुस्तक भिशी उपक्रमाची वाचन चळवळीचे संवर्धन करणे, मोबाईलच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांना वाचनाभिमुख करण्यासाठी शाळेत उद्बोधन करणे, प्रत्येक तालुक्यात भिशी गट स्थापन करून पुस्तकांची परस्परपूरक मोफत देवाण-घेवाण साखळी जिल्ह्यात निर्माण करणे, सभासद संख्या वाढल्यास प्रतिमाह एखादे व्याख्यान, चर्चासत्र ,परिसंवाद , काव्यवाचन , एकपात्री नाट्य असे कार्यक्रम आयोजित केले जातील, वाचकांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ देऊन त्यांचा प्रसंगोपात्त गुणगौरव करणे ही उद्दिष्टे आहेत.
पुस्तक भिशीसाठी वार्षिक २४०० रुपये आर्थिक योगदान द्यावे लागेल. दोन टप्प्यात देण्याचे सौजन्य मिळेल, प्रत्येक महिन्याला सभासदांसमक्ष चिट्ठी नुसार सोडत काढली जाईल, सोडत मध्ये ज्या सभासदांचा नंबर लागेल त्यांना एकूण सभासदांच्या जमा रकमेतून आपल्या आवडीची पुस्तके निवडण्याचा स्वतंत्र अधिकारासह पुस्तकांचा मालकी हक्क प्राप्त होईल, पुस्तकांचा मालकी हक्क मिळाला तरी भिशीतील सहयोगी सभासदांना पुस्तके वाचायला देणे बंधनकारक असेल, मालकी हक्क असणाऱ्यांना पुस्तकांच्या देवाण -घेवाणाची नोंद तपशीलवार स्वतंत्र रजिस्ट्ररमध्ये नियमानुसार ठेवावी लागेल, सहयोगी सभासदांना व्यक्तीश: पुस्तके घेऊन जावे लागतील .हस्ते परहस्ते देवाणघेवाण होणार नाही, सभासदांकडून पुस्तक हरवल्यास किंवा खराब झाल्यास पुस्तकाची मूळ किंमत भरपाई बंधनकारक असेल, पुस्तके खरेदी करण्याचा अधिकार भिशीच्या समन्वयांकडे राखून ठेवण्यात आले आहे हे सर्वसाधारण नियम ठेवण्यात आले आहेत.
कार्यक्रमास अथर्व पब्लिकेशनचे संचालक युवराज माळी तसेच कुमुद पब्लिकेशनच्या संचालिका सौ .संगीता माळी , वेद माळी,कुमूद माळी सन्माननीय वाचक सभासद डॉ . विजय बागुल , ह. भ. प. मनोहर खोंडे , श्रीमती उषा सोनार , आदर्श शिक्षिका ज्योती राणे, सौ . रुचिका भावसार , कवी अशोक पारधे , कवी गोविंद पाटील , श्रीमती वर्षा अहिरराव मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन मनोज भालेराव व आभार प्रदर्शन सौ.रुचिका भावसार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सगीर शेख ,दीपक महाले , सुनील महाजन ,स्वप्नील फलटणकर , सुनील पाटील , गिरीश चौगावकर यांनी अमूल्य सहकार्य केले .







