भारतीय सौर २६ आश्विन शके १९४२, निज आश्विन शुक्ल द्वितीया सायं. ५.२८ पर्यंत, चंद्रनक्षत्र: स्वाती सकाळी ८.५० पर्यंत, विशाखा उत्तररात्री ६.०७ पर्यंत, चंद्रराशी: तूळ रात्री १२.४६ पर्यंत, सूर्यनक्षत्र: चित्रा, सूर्योदय: सकाळी ६.३५, सूर्यास्त: सायं. ६.१२, चंद्रोदय: सकाळी ७.५४, चंद्रास्त: सायं. ७.४६,सूर्योदय: सकाळी ६.३५, सूर्यास्त: सायं. ६.१२, चंद्रोदय: सकाळी ७.५४, चंद्रास्त: सायं. ७.४६.
आजचे शुभ मुहूर्त :
अभिजित मुहूर्त : सकाळी ११ वाजून ४३ मिनिटे ते दुपारी १२ वाजून २९ मिनिटे.
विजय मुहूर्त : दुपारी ०२ वाजेपासून ते ०२ वाजून ४६ मिनिटे.
निशिथ काळ : रात्रौ ११ वाजून ४१ मिनिटे ते १२ वाजून ३१ मिनिटे.
अमृत काल : सकाळी १० वाजून २० मिनिटे ते ११ वाजून ४५ मिनिटे.
आजचे अशुभ मुहूर्त :
राहु काळ : सायंकाळी ०४ वाजून ३० मिनिटे ते ०६ वाजेपर्यंत.
यमगंड : दुपारी १२ वाजून ० ६मिनिटे ते ०१ वाजून ३१ मिनिटे.
गुलिक काळ : दुपारी ०२ वाजून ५७ मिनिटे ते ०४ वाजून २३ मिनिटे.
आजचे राशिभविष्य
मेष : घरामध्ये मंगलमय वातावरण राहील. कर्जाचे व्यवहार टाळावेत. मान, सन्मान प्राप्त होऊ शकतील. जुन्या मित्रांकडून उत्तम सहकार्य लाभेल. जनसंपर्कात वाढ होईल. जोडीदाराचे सहकार्य मोलाचे ठरू शकेल. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम ठरू शकेल.
वृषभ : नातेवाईकांमध्ये व्यवहार करताना योग्य ती काळजी घ्या. दिनक्रम अतिशय व्यस्त राहू शकेल. धावपळ करताना सावधगिरी बाळगावी. आपल्या निर्णय क्षमतेचा लाभ मिळेल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी आवर्जुन पैसे खर्च करावेत. भविष्यात याचा लाभ मिळेल. दिवसाच्या उत्तरार्धात एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी प्राप्त होऊ शकेल.
मिथुन : घरातील स्त्री वर्गाचा सल्ला उपयोगी पडेल. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. मोसमी आजार त्रस्त करू शकेल. एखाद्या समस्येला सामोरे जावे लागेल. अचानक लाभ मिळू शकतील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळू शकतील. दिवसाचा उत्तरार्ध संगीताचा रसास्वाद घेऊन उत्तम ठरू शकेल.
कर्क : कौटुंबिक उत्साह कायम टिकेल. भाग्यकारक दिवस. आपण घेत असलेल्या मेहनत, परिश्रमाचे चीज होईल. मुलांप्रति असलेला विश्वास आणखी मजबूत होईल. कुटुंबातील सदस्यांचे विशेष सहकार्य लाभेल. आवड जोपसण्यासाठी खर्च होईल. हितशत्रू पराभूत होतील. पालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
सिंह : कोणत्याही प्रकारच्या भागीदारीत मोठ्यांचा सल्ला घ्या. संमिश्र घटनांचा दिवस. मानसिक अशांतता, खिन्नता, विचलन शक्य. पालकांच्या शुभाशिर्वादामुळे दिवसाचा उत्तरार्ध अनुकूल ठरू शकेल. सासरच्या मंडळींशी मतभेद शक्य. बोलताना तारतम्य ठेवावे. नेत्रविकार त्रस्त करू शकतील. आरोग्याची काळजी घ्यावी.
कन्या : योग्य वाटते ते बिनधास्त बोलून गैरसमज दूर करा. निर्भिडपणे कार्यरत राहाल. साहस आणि पराक्रमाच्या जोरावर कार्य पूर्णत्वास नेण्यास सक्षम व्हाल. पालकांचे शुभाशिर्वाद मिळू शकतील. पत्नीच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. विनाकारण अचानक खर्च उद्भवू शकतील. व्यापारात धनलाभाचे योग जुळून येऊ शकतील.
तुळ : आपले कष्ट आणि हिम्मतीचे चीज झाल्याचे स्पष्ट दिसेल. शुभकारक दिवस. अधिकार आणि संपत्ती वृद्धिंगत होण्याचे संकेत. सेवाकार्य मनापासून कराल. गुरुवर संपूर्ण श्रद्धा, निष्ठा ठेवावी. नवीन कार्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल कालावधी. कौटुंबिक वातावरण आनंदी, उत्साही व सकारात्मक असेल.
वृश्चिक : जुनी उधारी वसुली सुरू होईल. एखाद्या कारणामुळे मन अशांत, विचलित होऊ शकेल. काही समस्यांना सामोरे जावे लागू शकेल. व्यापार विस्तारीकरणाच्या प्रयत्नांना यश येईलच, असे नाही. धैर्य आणि प्रतिभेचा वापर करून शत्रूवर विजय प्राप्त करू शकाल. वादविवादापासून दूर राहावे. अपेक्षित यश मिळण्यासाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागू शकेल.
धनु : दिवस समाधानी जाणीव करून देईल. ज्ञानात भर पडू शकेल. परोपरकार, दानधर्म, पुण्य कार्य करण्याची इच्छा प्रबळ होऊ शकेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. भाग्याची भक्कम साथ लाभेल. आर्थिक स्थिती उत्तम असेल. दिवसाच्या उत्तरार्धात अपचनाचा त्रास संभवतो. आहार नियंत्रित आणि संयमित ठेवणे हिताचे ठरेल.
मकर : नवीन कार्याची सुरुवात करायला आता उशीर करू नका. एखादी बहुमूल वस्तू प्राप्त होऊ शकेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरू शकेल. प्रलंबित कामे मार्गी लागू शकतील. सासरच्या व्यक्तींकडून मान, सन्मान प्राप्त होऊ शकतील. व्यवसायात लक्ष केंद्रीत करावे लागेल. गुंतवणुकीसाठी अनुकूल कालावधी.
कुंभ : आजची संध्यकाळ प्रसन्न राहील. बुद्धी, विवेकाने एखादे संशोधन करण्यात दिवस व्यतीत होऊ शकेल. आवश्यकता असेल, तेथेच खर्च करावा. एखाद्या आप्तेष्टाकडून फसवणूक होण्याची शक्यता. छोटे प्रवास घडू शकतील. दिवसात काही ना काही लाभ मिळू शकतील. मन प्रसन्न राहील.
मीन : लोकांच्या सांगण्यावरून कोणत्याही गोष्टीचा मनात राग धरून बसू नका. अनेक दिवसांपासून मुलांसंदर्भात असलेला एखादा वाद निकाली लागू शकेल. जनसंपर्कात भर पडेल. सामाजिक मान, सन्मान प्राप्त होऊ शकतील. मनोबल वाढीस लागेल. दिवसाचा उत्तरार्ध कुटुंबासोबत हास्य-विनोद, मौज-मजा करण्यात व्यतीत होऊ शकेल.
दिनविशेष – दुसरी माळ : दुर्गा देवीचे द्वितीय स्वरुप ब्रह्मचारिणी देवी
चातुर्मासात येणाऱ्या अश्विन महिन्यातील शुद्ध पक्षात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. प्रतिपदा ते नवमी अशा नऊ दिवसांच्या कालखंडात आदिमायेच्या विविध नऊ स्वरुपांचे पूजन, नामस्मरण, उपासना, जप, भजन, कीर्तन केले जाते. अगदी प्राचीन काळापासून नवरात्रोत्सव साजरे करण्याची परंपरा सुरू आहे. सन २०२० मध्ये १७ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. नवरात्रात संपूर्ण देशभरात आपापल्या पद्धतीप्रमाणे विशेष व्रतपूजन केले जाते. रविवार, १८ ऑक्टोबर २०२० रोजी नवरात्राची दुसरी माळ असून, दुर्गा देवीचे द्वितीय स्वरुप ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे.
कठोर तपाचे आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी ओळखली जाते. बह्मचारिणी देवीच्या उजव्या हातात माळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे. ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हींची प्राप्ती होऊ शकते, असे सांगितले जाते. हजारो वर्षे अत्यंत कठोर तपाचरण केल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरुपाला ब्रह्मचारिणी असे नाव पडले. देवीने कठोर तपाचरणाने महादेव शिवशंकराला प्रसन्न करून घेतले. ब्रह्मचारिणी देवीच्या शुभाशिर्वादामुळे तप, जप, ज्ञान, वैराग्य, त्याग, संयम आणि धैर्य प्राप्त होते, असे सांगितले जाते.
सूर्योदयापूर्वी उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर ब्रह्मचारिणी देवीचे षोडशोपचार पूजन करावे. ब्रह्मचारिणी देवीला दूध किंवा दुधापासून तयार करण्यात आलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा, असे म्हटले जाते. तसेच पूजनानंतर यथाशक्ती, यथासंभव देवीच्या मंत्राचा जप करावा, असे सांगितले जाते. ब्रह्मचारिणी देवीचा मंत्र पुढीलप्रमाणे –
या देवी सर्वभूतेषु मां ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
दधाना कर मद्माभ्याम अक्षमाला कमण्डलू।
देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा।।
ब्रह्मचारिणी देवीने तप करताना अन्न-पाण्याचाही त्याग करून निर्जळी तपाचरण केले. सर्व देवतांनी आणि ऋषी, मुनींनी देवीला महादेव शिवशंकर पती म्हणून प्राप्त होण्याचे वरदान दिले. ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने सुख, शांतता, समृद्धता आणि धर्म प्राप्त होते. विवाहात येणाऱ्या समस्या, अडचणी दूर होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. ब्रह्मचारिणी देवीला केवळ साखर किंवा मिश्रीचा नैवेद्य दाखवला, तरी देवी प्रसन्न होते, असे म्हटले जाते. एकाग्रचित्ताने केलेल्या पूजनामुळे तणाव, चिंता दूर होऊन प्रसन्नता, निष्ठा आत्मविश्वास आणि ऊर्जेचा विकास होतो. यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतात, असे सांगितले जाते.







