पनवेल/अलिबाग-सोगावकर (प्रतिनिधी) – उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी उपचार केंद्र सुरू केल्यानंतर कोळीवाडा येथे स्वतंत्ररित्या नॉन कोविड गर्भवती माता प्रसुती केंद्र सुरू करण्यात आले आहे. तिथे अनेक समस्यांचा सामना करत आता पर्यतच दहा ते बारा बाळांना नैसर्गिकरित्या बाळंतपणातून जन्म लाभला आहे. रात्री विद्युत पुरवठा खंडित झाल्यास डॉक्टर, कर्मचाऱ्यांपुढे अंधाराचे साम्राज्य पसरायचे. सामाजिक कार्यकर्ते आणि भाजपचे सक्रिय कार्यकर्ते गणेश वाघिलकर यांनी सामाजिक भान जपत ती समस्या दूर केली.
रात्री अचानक विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने बाळंतपण करताना डॉक्टर, नर्सना मोठी अडचण निर्माण होत असल्याच्या दोन-तीन घटनांची माहिती त्यांनी त्याचवेळी सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांना दिली होती. अनेकदा कडू यांनी महावितरणला सांगून खंडित विद्युत पुरवठा पूर्ववत करून घेतला होता.
ही घटना वाघिलकर यांना सांगताच ते स्वतःच गर्भवती प्रसुती केंद्रात इन्व्हर्टरची व्यवस्था करून देण्यास तयार झाले. त्यानंतर आठवडाभरात कडू यांनी त्यांना विनंती करताच हॉस्पिटलच्या काही भागाला प्रकाशमान करेल अशी उत्तम दर्जाची इन्व्हर्टरची यंत्रणा स्व:खर्चाने कार्यान्वित करून दिली. यासाठी त्यांनी 36 हजार रूपये मोजले आहेत. त्यांच्या दर्या सागर सामाजिक संस्थेने अनेक ठिकाणी अशी यंत्रणा भेट दिल्याचेही त्यांनी सांगितले.
सामाजिक भान जपत त्यांनी भेट दिलेल्या इन्व्हर्टरमुळे आता विद्युत पुरवठा खंडित झाला तरी हॉस्पिटलच्या कामात अडथळा येणार नसल्याने तेथील कर्मचाऱ्यांनी वाघिलकर आणि कडू यांना धन्यवाद दिले आहेत.







